
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेतील लाभासाठी १०० रुपयांची लाच घेणाऱ्या भाग्यश्री विजय पाटील या महिला कर्मचाऱ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने ३ जून २०२६ रोजी कल्याणकारी मंडळाच्या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. ४ जून रोजी आवश्यक संच घेण्यासाठी तक्रारदार जेव्हा वितरण केंद्रावर पोहोचले, तेव्हा तिथे असलेल्या भाग्यश्री पाटील यांनी त्यांना संच देण्यासाठी लागणारे फॉर्म विकत घेण्यासाठी १०० रुपयांची मागणी केली. खरं तर, ही सेवा मोफत असतानाही पैशांची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने आज सापळा रचला आणि लाचेची रक्कम स्वीकारताना भाग्यश्री पाटील यांना रंगेहात पकडले. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून १३,६७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. याव्यतिरिक्त, परिसरातील स्टीलच्या डब्यातून आणखी १३,१०० रुपये रोख रक्कम आढळून आली, ज्यामुळे एकूण २६,७७० रुपये जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आणि पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरक्षक सुरेश पाटील, पोहेकॉ बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई केली आहे. लाचखोरीच्या विरोधात नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.



