Home प्रशासन केळी पंचनाम्यातील त्रुटींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार ; तीव्र आंदोलनाचा इशारा

केळी पंचनाम्यातील त्रुटींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार ; तीव्र आंदोलनाचा इशारा

0
1


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानाच्या पंचनाम्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळून येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पंचनाम्यांची तात्काळ फेरतपासणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाने दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यात अनेक गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. अनेक शेतकऱ्यांच्या अहवालात लागवड क्षेत्र कमी दाखविण्यात आल्याचा, चुकीचे गट क्रमांक नमूद करण्यात आल्याचा तसेच अपूर्ण माहिती नोंदवून प्रत्यक्ष नुकसानीची योग्य पाहणी न करता पंचनामे पूर्ण केल्याचा आरोप करण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीतून पिकांची लागवड केली असून नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पंचनाम्यातील त्रुटी कायम राहिल्यास हजारो शेतकरी शासनाच्या नुकसानभरपाईपासून तसेच पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने सर्व पंचनाम्यांची विशेष तपासणी करून ७/१२ उतारे, विमा नोंदी आणि महसुली अभिलेखांच्या आधारे वस्तुनिष्ठ पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच चुकीचे पंचनामे तातडीने दुरुस्त करून नव्याने अचूक पंचनामे करण्यात यावेत आणि कोणत्याही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावल तालुक्यातील केळी उत्पादकांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास तयार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने त्वरित कार्यवाही केली नाही तर व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, भुसावळ तालुकाध्यक्ष विलास पाटील, शहराध्यक्ष संतोष चौधरी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, ॲड. देवकांत बाजीराव पाटील, युवती जिल्हाध्यक्षा भाग्यश्री ठाकरे, भुसावळ नगरसेवक निलेश कोलते, अक्षय बोरोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई आणि विमा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा सुरूच राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पंचनाम्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी पुन्हा करण्यात आली.


Protected Content

Play sound