दीपनगर ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दीपनगर येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात साहित्य, वाचनसंस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कवी राजेश पवार यांच्या ‘माझी सखी’ या काव्यसंग्रहाचे तसेच तृप्ती प्रतिमा यांच्या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, नवोदित लेखक आणि वाचनालयातील सक्रिय वाचकांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. ललित मिरुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गोपीनाथ घाडगे, बी. एम. ताजणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी वाचनसंस्कृतीचा प्रसार करण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत ग्रामीण भागात अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
यावेळी वाचनालयात नव्याने उपलब्ध झालेल्या पुस्तकांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच वाचनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. साहित्यिकांनी आपल्या मनोगतातून नवोदित लेखकांनी सातत्याने लेखन करत समाजप्रबोधनाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वाचनालयाचे अध्यक्ष, संचालक मंडळ, ग्रंथपाल आणि सदस्यांनी केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे वाचनाची आवड वाढण्यास आणि नव्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळण्यास मोठी मदत होत असल्याची भावना व्यक्त केली.



