
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर मतदारसंघातील रावेर आणि यावल तालुक्यात गुरुवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाला नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

४ जून रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास रावेर आणि यावल तालुक्यात अनेक गावांमध्ये अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी, मका तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून अनेक बागांमधील झाडे कोसळल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल जावळे यांनी महसूल, कृषी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने नुकसानग्रस्त भागांचा सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना दिल्या. उद्यापासून युद्धपातळीवर पंचनामे करण्यात यावेत तसेच कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आमदार अमोल जावळे हे नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेणार असून शासनाकडून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



