ठरले….सतरा मजलीवर भगवाच फडकणार !

जळगाव प्रतिनिधी । आज झालेल्या महापौर आणि उमपहापौरपदांच्या निवडणुकीत शिवसेनेने ३८ ही मॅजिकल फिगर क्रॉस करत बाजी मारली असून या माध्यमातून सतरा मजलीवर पुन्हा एकदा भगवा फडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेने ४५ तर भाजपने ३० मते मिळविली.

याबाबत वृत्त असे की, आज पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखालील सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. यात प्रारंभी अ‍ॅड. शुुचीता हाडा यांनी यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतले. त्यांनी जयश्री महाजन यांच्या अर्जात त्रुटी असून कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा दावा केला. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी ही आक्षेप फेटाळून लावले. याप्रसंगी सभागृहात वाद झाले.

यामुळे निवड प्रक्रिया सुरू असतांना स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी ही ऑनलाईन सभा बेकायदेशीर असून भाजप याच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली. ही निवड निवडणूक अधिनियम २००५ च्या प्रमाणे होत नसल्याने आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

ऑनलाईन मतदान सुरू झाल्यानंतर भाजपच्या सदस्या भारतीताई सोनवणे आणि अ‍ॅड. शुचीता हाडा यांनी आवाज बरोबर येत नसल्याची तक्रार केली. तर, माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणार्‍यांवर कारवाईची मागणी केली. यामुळे सभागृहात पुन्हा थोडा गोंधळ उडाला. यानंतर सर्व नगरसेवकांचे मतदान घेण्यात आले.

शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत शिवसेनेचे सौ. जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील या दोन्ही मतदारांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्‍चित झालेला आहे. त्यांनी बहुमताचा ३८ हा आकडा क्रॉस केल्यामुळे ते जिंकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेने ४५ तर भाजपने ३० मते मिळविली.लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

Protected Content