भंगार विकून पैसा जनहितासाठी खर्च करा- दारकुंडे

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या विविध भागांमध्ये असणारे भंगार विकून यातून आलेल्या पैशांचा जनहितासाठी वापर करण्याची मागणी सत्ताधारी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे.

नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांना एक निवेदन देऊन महापालिकेतील भंगारबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. यात म्हटले आहे की, महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांत मोठ्या प्रमाणात वापरात नसलेल्या वस्तू भंगारात पडून आहेत. त्याचा वापरही होत नसून पावसात त्या कुजताहेत. अनेक वर्षापासून साठवून ठेवलेल्या भंगार परस्पर विक्रीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे महापालिकेने एकाच वेळी सर्व भंगाराचा लिलाव करून मिळणारा पैसा जनहितासाठी खर्च करावा, अशी मागणी दारकुंडे यांनी केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शहरातील आरोग्य व बांधकामसह पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत वापरात न येणार्‍या गाड्या, कचराकुंडी व अतिक्रमण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या साहित्याचे भंगार अनेक वर्षांपासून जमा आहे. हे साहित्य वर्षानुवर्षे पडून अधिक खराब होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील बरेच साहित्य चोरीला जात आहे. या साहित्याचा लिलाव करण्याची मागणी दारकुंडे यांनी केली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे उद्यानातील कर्मचार्‍यांची इतरत्र नियुक्ती केल्यामुळे देखभाल दुरूस्ती अभावी उद्यानांचा कचरा डेपो झाला आहे. वाढलेले गवत, साठलेला पालापाचोळा यामुळे अस्वच्छता निर्माण झाली असून याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content