Jalgaon News जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा सहकारी दुध संघातील संचालक आणि प्रशासकातील वादाबाबत दाखल याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे.
जिल्हा दुध संघातील वाद आता न्यायालयात पोहचला आहे. दूध संघातील संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक मंडळ नियुक्तीचे आदेश शासनाकडून काढण्यात आले होते. दरम्यान, संचालक मंडळाने प्रशासक मंडळ नियुक्तीविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. प्रशासक मंडळाने घेतलेला पदभार बेकायदेशीर असल्याचा दावा संचालकांनी केला आहे.
या विषयावर न्यायालयीन कामकाज सुरू आहे. बुधवारी या विषयावर सुनावणी होणार होती; परंतु आता शुक्रवारी म्हणजे २६ ऑगस्ट रोजी न्यायालयात या याचिकेवर कामकाज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात आता नेमके काय होणार याकडे राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे अध्यक्ष असणार्या संचालक मंडळावर प्रशासक मंडळाने गंभीर आरोप करत १० कोटींच्या अनियमिततेचा ठपका ठेवला आहे. या संदर्भात चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. यातच आता न्यायालयीन लढाई देखील सुरू झाली असून यातून आलेला निकाल हा जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे.