फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत ३ वर्षाकरिता मृत बहार व अंबिया बहाराकरीता लागु करण्यात आली आहे. तीन हजारात ६० हजार रूपयांचे पीक विमा संरक्षण राहणार असून फळपिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषि विभागातफे करण्यात आले आहे.

फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यासाठी मृग बहार मोसंबी, चिकु, पेरु, डाळीब, लिंबू व सिताफळ या फळपिकांसाठी भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये महसुल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन ही योजना फळपिकासाठी अधिसुचित मंडळामध्ये राबविण्यात येणार आहे.

या योजनेव्दारे मृग बहार फळपिकनिहाय कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त पाऊस, जादा आर्द्रता या हवामान घटकाच्या धोक्यांपासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे. ही योजना सर्व कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी ऐच्छिक राहील. अधिसुचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारपैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. मोसंबी व डाळीब) जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणा पत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग बंधनकारक समजला जाईल.

मृग बहार 2021-22 करिता पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत, विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता दर तपशिल खालीलप्रमाणे आहे. पेरु साठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये प्रति हेक्टर असून यासाठी 3 हजार रुपये विमा हप्ता राहील. लिंबू साठी विमा संरक्षित रक्कम 70 हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा हप्ता रक्कम 3 हजार 500 रुपये, मोसंबी साठी विमा संरक्षित रक्कम 80 हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा हप्ता रक्कम 4 हजार रुपये, चिकू साठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा हप्ता रक्कम 7 हजार 800 रुपये असून या सर्व फळपिकांसाठी सहभागी होण्याची अंतिम मुदत 30 जून, 2021 पर्यंत आहे. तर डाळींब साठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 30 हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा हप्ता रक्कम 6 हजार 500 रुपये असून सहभागाची अंतिम मुदत 14 जुलै, 2021 असून सिताफळ साठी विमा संरक्षित रक्कम 55 हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा हप्ता रक्कम 2 हजार 750 रुपये असून सहभागाची अंतिम मुदत 31 जुलै, 2021 पर्यंत आहे. 

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँका, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुका), उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव, भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई  टोल फ्री नंबर -18002660700 ईमेल- [email protected] यांचेशी संपर्क साधावा. तर  जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग बहाराकरिता अधिसुचित फळपिकांना राबविण्यात येत आहे. तरी या विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 

Protected Content