रेल्वे महाव्यवस्थापकांसोबतच्या बैठकीत खा. उन्मेष पाटील यांच्या विविध मागण्या

जळगाव प्रतिनिधी । रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या सोबतच्या ऑनलाईन बैठकीत खासदार उन्मेष पाटील यांनी विविध प्रश्‍नांचा उहापोह करून त्यांना मार्गी लावण्याची मागणी केली.

मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या उपस्थितीत गुरूवारी मध्य रेल्वेच्या समस्या, अडीअडचणी बाबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी विविध समस्यांना हात घातला. मतदारसंघातील मध्य रेल्वे मार्गांवरील सातत्याने प्रलंबित राहिलेल्या समस्या तसेच नवीन प्रकल्पासंदर्भात त्यांनी या बैठकीत परखड मत व्यक्त केले.

चाळीसगाव येथे अनेक वर्षांपासून चाळीसगाव रेल्वे स्टेशनला लागून वेल्डिंग बट फ्लॅश कारखाना अस्तित्वात होता. हा कारखाना सद्यस्थितीत कंत्राटी पद्धतीने चालविल्या जात आहे याठिकाणी १३० मीटर लांबीचे रेल्वे रूळ बनविले जात होते. हा कारखाना येथून स्थलांतरित करण्यासंदर्भात रेल्वेकडून हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. हा कारखाना येथून स्थलांतरित करण्यात येऊ नये स्थलांतरित करायचं असेल तर तो चाळीसगाव धुळे रेल्वे मार्गावर जामदा रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेची मोठी जागा अस्तित्वात आहे या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाण्याची सुबत्ता असल्याने हा कारखाना येथे सुरू करावा अशी मागणी खा. उन्मेष पाटील यांनी केली. तसेच १३० मीटर ऐवजी ते हा उपक्रम मोठा करून २६० मीटर लांबीचे रेल्वे रुळ तयार होतील असा करावा असे ते म्हणाले.

दरम्यान, आजमितीस वर्धा येथून रेल्वे रुळ मागविले जात असून जामदा येथे हा कारखाना सुरू केल्यास नागपूर सोलापूर पुणे मुंबई भुसावळ या विभागांना फायदा होईल. याबाबतीत कार्यवाही करावी तसेच जामदा रेल्वे स्टेशन जवळ बारमाही वाहणारी गिरणा नदी अस्तित्वात आहे. जामदा स्टेशन परिसरात रेल्वेची मोठी जमीन देखील उपलब्ध आहे यामुळे रेल नीर या पिण्याच्या पाण्यासाठी असलेला रेल्वेचा नवीन उद्योग येथे सुरू करावा. यासह अनेक समस्या, मागण्या यापूर्वी देखील आपल्याा कार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला असून याबाबत कार्यवाही व्हावी.अशी मागणी यावेळी खासदार पाटील यांनी केली.

खासदार पाटील पुढे म्हणाले की, औरंगाबाद चाळीसगाव रेल्वे मार्गाचे पुनसर्वेक्षण करून त्याबाबत कार्यवाही करावी. तसेच खानदेशातील ६० विद्यार्थ्यांसह राज्यातील ३०० विद्यार्थ्यांचा गेल्या अनेक वर्षापासून चा नोकरी सदर्भातील प्रश्‍न मार्गी लावावा.चाळीसगाव धुळे रेल्वे मार्ग नरडाणा पर्यंत जोडण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करून कामाला गती द्यावी. चाळीसगाव-धुळे-नरडाणा हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्यास मध्य रेल्वे ही पश्‍चिम रेल्वे यांना जोडणारा नवा मार्ग उत्पन्नाचे नवे उच्चांक करेल. याकरीता मध्य रेल्वे व पश्‍चिम रेल्वे यांना जोडणारे नरडाणा कामाला तातडीने गती द्यावी. चाळीसगाव रेल्वे स्थानकातून औरंगाबाद जिल्हा, नाशिक जिल्ह्याचा काही भाग व धुळे जिल्ह्याचा अधिकतर रेल्वे प्रवासासाठी चाळीसगाव केंद्रबिंदू आहे. येथून दिल्लीला जाण्यासाठी राजधानी एक्सप्रेस थांबा चाळीसगाव अथवा जळगाव येथे देण्यात यावा. ही या परिसरातील सर्वात प्रमुख मागणी आहे,तसेच रामेश्‍वर ओखा पुरी एक्सप्रेसला चाळीसगाव येथे थांबा देण्यात यावा. या गाडीने धुळे, चाळीसगाव परिसरातील प्रवाशांना तिरुपती बालाजी जाण्यासाठी सोय होईल, मनमाड सिकंदराबाद अजंता एक्स्प्रेसला मनमाड येथे मोठा हॉल्ट असून तीला भुसावळ सिकंदराबाद अजंता एक्सप्रेस या पद्धतीने सुरू केल्यास नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव असे थांबे देता यावेत,हुतात्मा एक्सप्रेसला म्हसावद स्टेशनवर थांबा देण्यात यावा. या गाडीमुळे मुंबई – पुणे येथील भाविकांची तिर्थक्षेत्र पद्मालय या गणपती दर्शनासाठी सोय होईल असे ते म्हणाले.

तसेच लॉकडाऊन मुळे बंद असलेल्या देवळाली भुसावळ शटल सेवा, भुसावळ मुंबई पॅसेंजर, धुळे चाळीसगाव पॅसेंजर, पाचोरा जामनेर पीजे पॅसेंजर, भुसावळ ते सुरत पॅसेंजर, तातडीने सुरू करून सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची सोय तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी. चाळीसगाव धुळे पॅसेंजर या गाडीला पुणे व मुंबई येथे जाण्यासाठी बोगी जोडल्या जातात. महाराष्ट्र एक्सप्रेस, अमृतसर एक्सप्रेसला धुळे जिल्ह्यातून येणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी बोगी आज बंद करण्यात आलेल्या आहेत. मात्र जो पर्यंत येथून नवीन गाडी ची व्यवस्था होत नाही तोपर्यंत या बोग्यांची सेवा पूर्ववत सुरू ठेवावी. तसेच धुळे येथून धुळे पुणे एक्सप्रेस (धुळे चाळीसगाव कल्याण पुणे) अशी नवी एक्सप्रेस गाडी सुरू करावी जेणेकरून धुळे जिल्ह्यातील प्रवाशांना याचा अधिक लाभ होऊन धुळे चाळीसगाव पॅसेंजरला लावण्यात येणार्‍या बोग्या बंद झाल्याने होणारी गैरसोय दूर होईल.अमळनेर धरणगाव पाचोरा चाळीसगाव येथे एस्कलेटर जिन्याची तसेच चाळीसगाव पाचोरा रेल्वे स्टेशन येथे लिफ्टची सुविधा तातडीने सुरू करण्यात यावी. तसेच चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूस रेल्वे पार्किंग सुविधा करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी. जळगाव प्लास्टिक चटईचे हब असल्याने किसान रेल गाडीला जळगाव रेल्वे स्थानकातून प्लास्टिक चटई उद्योगांच्या सोईसाठी या रेल्वेगाडीला एक्स्ट्रा डबे जोडून रेल्वे मालवाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

या बैठकीत खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, चाळीसगाव स्टेशनवर मका, सिमेंट, खतांचे मोठ्या प्रमाणात रॅक लागतात. सद्यस्थितीत चाळीसगाव एमआयडीसी मध्ये गुजरात अंबुजा ही नवीन मका स्टार्च फॅक्टरी अस्तित्वात आली आहे. ही रेल्वे वाहतूक सेवेचे मोठे ग्राहक आहेत. त्यांच्या सहपरिसरातील व्यापार्‍यांची बाराही महिने मक्याची वाहतूक होत असते. याकरिता चाळीसगाव स्टेशनवर असलेला गुड शेड हे हिरापूर रोड स्टेशन येथे सुरू करावे. चाळीसगाव गुड शेड शहरातून असल्याने रेल्वे वाहतूक सेवा वापरण्यास नाखूष असलेला व्यापारी यांची यासंदर्भात होणारी अडचण दूर होऊन ग्राहकांना रेल्वे सेवेचा अधिकाधिक लाभ घेता येईल. तसेच पिंप्राळा येथील रेल्वे पुलावर आर्म टाकून पिंप्राळा रोडला जोडण्यात यावे. यासह लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या मांडून त्या बाबत तातडीने कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी यावेळी केली.

Protected Content