अभियंता दिनाला इंजिनिअर खासदारांनी घेतली सरकारी अभियंत्यांची झाडाझडती !

जळगाव-राहूल शिरसाळे Special Report | आज सर्वत्र राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा केला जात असतांना स्वत: इंजिनिअर असणारे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणच्या अभियंत्यांची अक्षरश: खरडपट्टी काढली. या दिवसाचा योगायोग हा चर्चेचा विषय बनला आहे.

खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केमीकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली आहे. अर्थात, यामुळे संसदेसह सार्वजनीक व्यासपीठांवरून बोलतांना ते अभियांत्रीकीशी संबंधीत विषय हे अतिशय सफाईदारपणे मांडत असल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. अर्थात, कामात आक्रमक असले तरी त्यांच्या वागण्यात एक सुसंस्कृतपणा असल्याचेही आजवर दिसून आले आहे. आज मात्र त्यांच्यातील आक्रमकता बाहेर पडली ती जळगावातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दशेमुळे !

याचे झाले असे की, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी त्यांच्या डायमंड व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातून शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दशेबाबतचा मुद्दा मांडला. यातून हायवेशी संबंधीत अनेक समस्या समोर आल्या. त्यांनी याबाबत खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या कानावर हा विषय घातला. आज खासदार हे जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी आले होते. बैठक आटोपल्यानंतर तेथून थेट राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली.

या पाहणीत हायवेवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी रस्त्यांची लेव्हलच वर-खाली झाल्याने अपघाताची शक्यता असल्याचे दिसून आले. उड्डाण पूल आणि अंडरपासच्या ठिकाणी चक्क पावसामुळे पाण्याची गळती लागल्याचेही दिसून आले. पाण्याचा निचरा होण्यासाठी नसणारी सुविधा, पथदिव्यांचा अभाव आदींसारख्या अनेक समस्या देखील यातून समोर आल्या. याबाबत खासदार उन्मेषदादा पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात न्हाईच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता त्यांनी सरकारी उत्तर देऊन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.

या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी अक्षरश: रूद्रावतार धारण केला. काम करा, नाही तर बदल्या करून घ्या, तुम्हाला जनतेचे हित बघायचे आहे की, ठेकेदाराचे ? अशा प्रश्‍नांची सरबत्ती करून त्यांनी अधिकार्‍यांना अक्षरश: निरूत्तर केले. तर, कामे न केल्यास याच रस्त्यावरील डांबर हे तुमच्या तोंडाला फासू असा इशारा देखील त्यांनी दिला. अखेर या प्रकरणी सात दिवसांच्या आत कार्यवाहीचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिले. यावर खासदार पाटील यांनी सात दिवसात काम न झाल्यास याद राखा असा दम देखील त्यांना दिला.

आज अभियंता दिन आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणात अभियंत्यांचेच महत्वाचे परिश्रम आहेत. मात्र यात कुचराई झाल्याने जळगावकरांसह यावरून जाणार्‍या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी सरकारी इंजिनिअर्सची अक्षरश: शाळा भरविल्याचे दिसून आले. तर अभियंता दिनाचा योगायोग आल्याने याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

खालील व्हिडीओजमध्ये पहा खासदार उन्मेषदादा पाटील यांचा रूद्रावतार !

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1097542197822227

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1036075913728225

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1131714537726842

Protected Content