मुख्यमंत्री साहब…मुस्कुराइए आप जलगाँव में हैं !

795853 uddhav thackeray 970

जळगाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचे नुकतेच जळगावात आगमन झालेय. शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आपण मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच जळगावात आलात. आपल्या सोबतीला पवार साहेब आहेतच. जळगाव शहर आणि भुसावळकडून आपण एकनाथराव खडसेंच्या गावाला जाताय. त्यामुळे पायाभूत सुविधांपासून ते उच्च दर्जाच्या प्रकल्पांपर्यंत विकासकामांचा ठणठणाट असणार्‍या आमच्या जिल्ह्यात असलेल्या अनेक समस्या आपल्याला सांगायच्या आहेत. बेपर्वा राजकारणी, हप्तेखोर प्रशासकीय यंत्रणा,दोन नंबरचे धंदे व निर्ढावलेले गुन्हेगार आता समस्या सांगाव्यात तरी किती…पण असो आपण सुहास्य वदनाने या…कारण आपण सोशीक पण अगत्यशील जळगावात आहात !

 

माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब सर्वप्रथम खड्डे उर्फ धूळगाव अर्थात आमच्या जळगावात आपले हार्दिक स्वागत ! शेतकऱ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपण मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा जळगावात येताय. आपल्या सोबतीला पवार साहेब आहेतच. म्हणूनच जिल्ह्यात शेतकऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे, हे आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो. जळगाव जिल्ह्यात जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत १९५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. प्रशासनाच्या कमिटीने मात्र त्यापैकी १०९ प्रकरणातच कर्जबाजारीपणाने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मान्य केलेय. ६० प्रकरणं अपात्र तर २६ प्रकरणं अजूनही प्रलंबित आहेत. सन २०१८ मध्ये शेतकरी आत्महत्येचा आकडा १४१ होता. याचाच अर्थ शेतकरी आत्महत्येत साधारण ४० टक्क्याने वाढ झालीय. सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षात १०२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आपण मुक्ताईनगरच्या दौऱ्यातून आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला काय देऊन जाता?, याकडे आम्ही केवीलवाण्या नजरेने बघतोय.

 

उद्धव साहेब… आता तुम्ही एकनाथराव खडसे यांच्या गावाला जाताय. म्हणून अगदी थोडक्यात काही दिवसांपूर्वी खडसेंनी केलेल्या एका महत्वपूर्ण मागणीकडे आपले लक्ष वेधू इच्छितोय…खडसेंनी जिल्ह्यात सुरु असलेले दोन नंबरचे धंदे अर्थात सट्टा,पत्ते, दारू,गांजा वैगैरे…वैगैरे बाबत व्हीडीओ,ऑडीओ क्लिपसह अनेक पुरावे पोलीस अधिक्षाकांकडे दिले आहेत. धक्कादायक म्हणजे या दोन नंबरच्या धंद्यांमध्ये पोलीस प्रशासनाचा सहभाग असल्याचा आरोपही खडसे यांनी केलाय. अगदी एका पोलीस स्थानकाला साधारण महिन्याला ४० लाखांचे उत्पन्न असल्याचे देखील खडसेंनी म्हटलेय. काही महिन्यांपूर्वी (फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतांना) शाम दीक्षित या सामाजिक कार्यकर्त्याचा जळगावात खून झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी आंदोलन केले होते. यावेळी रात्रीतून आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसरीकडे याच महिन्यातील एक गोष्ट आपल्या माहितीस्तव सांगतो…जळगाव जिल्हा परिषदेच्या आवाराला चक्क ‘रेड लाईट एरिया’ करण्यापर्यंत काहींची मजल गेलीय.

 

बरं ठाकरे साहेब…मुक्ताईनगर जातांना तुम्हाला रस्त्यात भुसावळ लागेल. याच भुसावळमध्ये राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच गँगवारमधून एकाच परीवारतील ५ जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आजही भुसावळच्या गल्लीबोळात गावठी पिस्तुलं खेळण्यातील बंदुकी प्रमाणे अगदी सहज मिळताय. मुख्यमंत्री साहेब…वेळ मिळालाच तर हिंगोणा येथील अपघातस्थळी भेट देण्याचाही प्रयत्न करा. कारण वाळू माफियांमुळे याठिकाणी १२ लोकांना आपला हकनाक जीव गमवावा लागला होता. दुसरीकडे वाळू माफियांवर कारवाई करायला जळगावात पोलीस अधिकारी समोर आला तर, वाळू माफिया रस्त्यावर उतरत त्या अधिकाऱ्याला कंट्रोल रूमला जमा करण्याची धमकी देतात. त्यामुळे ठाकरे साहेब…तुमच्या प्रशासनात वाळू माफियांकडे पोलीस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे अधिकार आहेत का? नसल्यास जाता-जाता का होईना, आपल्याकडून खुलासा अपेक्षित आहे. तर यावरून जळगाव जिल्ह्यात कायदा-सुव्यस्थेची स्थिती किती चांगली आहे? हे आपल्या लक्षात आलेच असेल.

 

दुसरीकडे आमचे अख्खे जळगाव शहर खोदून काढलेले आहे. कदाचित विमानातूनच तुम्ही बारकाईने बघितले तर दिसूही शकतील. आमच्या जळगावात रस्ते कमी खड्डे जास्त, हवा कमी धूळ जास्त तसेचं आरोग्य सुविधा कमी आणि अपघाती मृत्यू जास्त झाले आहेत. पाठ, मान आणि मणक्यांच्या आजारासह श्वासानाच्या विकारांनी जळगावकर त्रस्त झाले आहेत. जळगाव जिल्ह्याचा रस्ते अपघातात राज्यात पाचवा क्रमांक लागतो. वर्षभरात जळगाव जिल्ह्यात साधारण ८३५ अपघातात ४५४ जण ठार झाले आहेत. आमच्या शहरातून जाणारा महामार्ग जणू एखादं राक्षसाप्रमाणे आठवड्याभरात कुणाला तरी गिळंकृत करतो म्हणजे करतोच. असो…मुखमंत्री महोदय आपण पहिल्यांदा येताय म्हणून थोडक्यात थांबतो…पण ठाकरे साहेब…थोडा वेळ काढून जिल्ह्याचा आढावा घ्या हो…भलत्या परेशानीत आहेत, आम्हू !

 

आपलाच एक जळगावकर ! 

Protected Content