महापालिकेस दिला लाकूडसाठा; विद्यापीठाला महापालिकेतर्फे आभारपत्र !

जळगाव प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातर्फे महापालिकेस लाकडांचा मोठा साठा मिळाला असून यामुळे प्रशासनाची लाखो रूपयांची बचत होणार आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज महापौर आणि उपमहापौर यांनी विद्यापीठाला भेट देऊन महापालिकेतर्फे आभारपत्र प्रदान केले.

याबाबत वृत्त असे की, सध्या नेरी नाका स्मशानभूमि ही कोरोना रूग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी राखीव करण्यात आलेली आहे. यातच आता मृत्यूचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे लाकडेही मोठ्या प्रमाणात लागत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाकडे असणारा लाकडांचा साठा महापालिका प्रशासनाला मिळावा यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते.

विद्यापीठात खूप मोठ्या प्रमाणात वृक्षराजी असून यातील कोरडे झालेली लाकडे जमा करण्यात येतात. आजवर विद्यापीठाकडे १०० टनांपेक्षा जास्त सुकलेली लाकडे जमा झालेली आहेत. खरं तर, विद्यापीठाने आधीच महापालिकेला स्मशानभूमिसाठी हा लाकडांचा साठा मोफत देण्यासाठी पत्रव्यवहार दिला होता. यासाठी विद्यापीठाने
२८ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिकेला पत्रदेखील पाठविण्यात आले असले तरी मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ही लाकडे लिलावाच्या माध्यमातून विकण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर महापालिकेने त्यांची विनंती करून हा लिलाव स्थागित केला होता. मात्र या नंतरही हा साठा महापालिकेला मिळावा यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नव्हते.

ही बाब लक्षात घेऊन २७ एप्रिल रोजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिका प्रशासनाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती घेऊन आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी विद्यापीठ प्रशासनाशी प्राथमिक चर्चा करून महापालिकेत २८ एप्रिल रोजी बैठक घेतली. या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघाल्याने विद्यापीठातील लाकडांचा साठा महापालिकेला मिळण्याचे संकेत मिळाले होते.

विद्यापीठ प्रशासनाने पाठविलेल्या पत्रानुसार महापालिकेने आपल्या कर्मचार्यांना पाठवून शुक्रवारपासून तेथील लाकूडसाठा नेरी नाका स्मशानभूमित आणण्यास प्रारंभ केला आहे. हा साठा खूप मोठ्या प्रमाणात असल्याने याला आणण्यासाठी काही दिवस लागतील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वैकुंठभूमिसाठी लाकडांचा साठा दिल्यामुळे महापालिकेची लाखो रूपयांची बचत होणार आहे.

दरम्यान, आज सकाळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व आयुक्त सतीश कुलकर्णी व माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला भेट दिली. याप्रसंगी लाकूड साठ्याची पाहणी करण्यात आली. तसेच विद्यापीठ प्रशासनाला महापालिकेतर्फे आभारपत्र देखील प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्र कुलगुरू बी. व्ही. पवार, प्र कुलसचिव डॉ. एस आर. भादलीकर, वित्त लेखा अधिकार गोहील, सिनेट सदस्य दीपक पाटील, उप अभियंता राजेश पाटील, उद्यान अधीक्षक अश्‍विनी पाटील, जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, शहर अभियंता भोसले यांची उपस्थिती होती.

Protected Content