ज्या खडसेंनी युती तोडली त्यांच्यासोबतच तुम्ही बसलेत ! : ना. गुलाबराव पाटील

Jalgaon News जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टिकेवर ना. गुलाबराव पाटील यांची खोचक उत्तर दिले आहे.

काल आदित्य ठाकरे यांचा दौरा पार पडला. यात त्यांनी पाचोरा, धरणगाव आणि पारोळा मतदारसंघात बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी येथील तिन्ही आमदारांच्या नावांचा उल्लेख न करता त्यांना गद्दार संबोधून टीका केली. ही सभा आटोपल्यानंतर जळगावात पत्रकारांशी बोलतांना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचा समाचार घेतला.

ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे हे तरूण असून त्यांनी मंत्री बनल्याबरोबर राज्यभरात फिरावे अशी आमची सर्वांची इच्छा होती. मात्र ते तेव्हा फिरले नाहीत. तर आता सत्ता गेल्यानंतर ते राज्यभरात फिरत आहेत. यामुळे आम्ही म्हणत होतो ते खरेच होते असे ना. पाटील म्हणाले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिवसेना वाचावी हा आमचा प्रयत्न होता. यासाठी आम्ही परिश्रम केले. मात्र त्यांनाच हे नकोसे होते असे दिसून आले.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शिवसेनेतून फुटणारा मी पहिला आमदार नव्हतो. २० आमदारांना घेऊन मी उध्दव ठाकरे यांच्याकडे गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही अनेकदा तह केले असल्याने आपण पक्ष वाचवण्यासाठी तह करावा असे मी सुचविले. मात्र त्यांनी ऐकले नाही. तेव्हाच तह केला असता तर ही वेळ आली नसती असा टोला त्यांनी मारला. तर, आम्ही आजही शिवसैनिकच असल्याचा पुनरूच्चार देखील त्यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी दौरा केला असावा. त्यांच्या दौर्‍यात टीका केल्याशिवाय दुसरं कामच होऊ शकत नाही. आम्ही जो प्रयत्न केलेला आहे तो शिवसेना वाचवण्यासाठी केला आहे. तो प्रयत्न आदित्य ठाकरे यांना आवडलेला दिसत नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

दरम्यान, याप्रसंगी त्यांनी राष्ट्रवीदीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्याबाबतही भाष्य केले. उध्दव ठाकरे यांनी ज्यांनी शिवसेना संपविण्याचे प्रयत्न केले त्या भाजपसोबत बंडखोर गेल्याची टीका केली होती. याबाबत ते म्हणाले की, ज्या एकनाथराव खडसे यांनी युती तोडली त्यांच्या सोबतच तुम्ही बसले. तेव्हा तुम्हाला काही वाटले नाही का ? असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. तर, आम्ही गद्दार नसून खुद्दार असल्याचेही ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

Protected Content