जळगाव प्रतिनिधी | उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार झाल्याचे वृत्त असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर हे चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी पिंप्राळा येथील कुलभूषण पाटील यांच्या घरावर गोळीबार केला. यात ते सुदैवाने बचावले असून ते आता तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत.
कुलभूषण पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड वेगाने पुढे आले आहेत. जळगाव महापालिकेतील सत्तांतरात त्यांचा मोठा वाटा होता. याचमुळे त्यांना उपमहापौरपद मिळाले आहे. या पार्श्वभूमिवर आज थेट त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी कुलभूषण पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. सध्या त्यांच्या घराजवळ मोठी गर्दी जमली आहे. उपमहापौरांची अनेकांनी दूरध्वनीवरून चौकशी केली. याची माहिती मिळताच नगरसेवक चेतन शिरसाळे, गजानन मालपुरे यांच्यासह इतरांनी त्यांची चौकशी केली.
(सविस्तर वृत्त लवकरच)