जैन उद्योग समुहातर्फे 60 दिवसात 5 लाख 79 हजार लोकांना स्नेहाची शिदोरी !

 

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 2 एप्रिलपासून शहरातील गरजवंतांसाठी दोन वेळच्या भोजन पाकिटांची उपलब्धता करुन देण्याची सेवा सुरू केली. चौथ्या लॉकडाऊनच्या अखेरच्या 60 व्या दिवसापर्यंत (दि.31) जवळपास 5 लाख 79 हजार लोकांपर्यंत भोजन पाकिटे नित्यनियमाने पोहचवली. या कार्यात जळगावमधील स्वयंसेवी व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गरजू घटकापर्यंत भोजन पाकिटे पोहचविण्याची कामगिरी उत्तमपणे पार पाडली.

 

कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी रोखण्यासाठी देशात दि. 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. सर्वच क्षेत्रात टाळेबंदी व कामबंदची स्थिती उद्भवली. याचा परिणाम आठ दिवसांनी दिसू लागला. कामगार, मजूर, रोजंदार, रस्त्यावरचे विक्रेते, गरजवंत वृद्ध, महिला, मुले अशा विविध घटकांतील लोकांच्या दोन वेळच्या भोजनाची भ्रांत निर्माण झाली. जळगावसारख्या शहरात अशा लोकांची संख्या नक्कीच काही हजारात होती. या आपत्तीत जैन उद्योग समुहाने स्वतःचे कर्तव्य समजून विविध प्रकारच्या सामाजिक भूमिका व जबाबदारी निभावल्या.

जळगाव हे सर्व बहुघटकीय शहर आहे. येथे उद्योग क्षेत्रातला कामगार आहे. हर एक सेवेत राबणारा मजूर आहे. रस्त्यावर छोट्या जागेत पोट भरणारा गरजवंत आहे. झोपडपट्टीतील दुर्बल रहिवासी आहे. अशा घटकांची आर्थिक व शिधा, किराणाविषयक कोंडी लॉकडाऊन काळात झालेली होती. याविषयी माध्यमांमधून चिंता व्यक्त होत होती. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशौक जैन, संचालक अतुल जैन यांनी आपत्ती काळात समाजाप्रति कर्तव्यपुर्तीचा निर्णय घेतला. गरजवंतांसाठी रोज भोजन पाकिटे देण्यासाठी खास यंत्रणा उभारली. उद्योग समुहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी सामाजिक कर्तव्यपूर्तीसाठी नेहमी स्वयंस्फूर्त पुढाकार घेण्याचा दिलेला वसा शिरावर घेऊन भोजन पाकिट पुरवठ्याचे कार्य सुरु झाले. मनोहर बागूल, भीमराव दांडगे यांच्यावर जबाबदारी टाकली गेली. जवळपास 40 जणांचे सहकार्य घेऊन रोजच्या भोजननिर्मितीची क्रिया ठरली. सुरक्षेचे सर्व निकष जसे मास्क, ग्लोजचा वापर, परस्परात अंतर, निर्जंतूक पॅकिंग आणि सुरक्षित पुरवठा अशी जबाबदारी निभावणे सुरु झाले. भोजन तयार करुन ते शहरातील कांताई सभागृहात पोहचविण्याची व तेथे गरजेनिहाय संस्था-संघटना प्रतिनिधींना वाटपासाठी जैन स्पोर्टच्या पदाधिकारी व खेळाडुंचे सहकार्य मिळाले.

एका व्यक्तीला दिवसभरासाठी लागणारे सकस अन्न या शिदोरीतून देण्यात येत होते. दि. 2 एप्रिलपासून भोजन पाकिटे वाटप सुरु झाले. पहिल्या दिवशी संख्या 3 हजार होती. पण नंतर 3 दिवसात मागणी वाढत जाऊन रोज सकाळ आणि सायंकाळ मिळून सरासरी 11 हजार भोजन पाकिटे वितरीत केली जात होती. रोजच्या भोजनाची गुणवत्ता त्याचे वेगळेपण, चव आणि पॅकिंग यावर व्यक्तीशः अतुल जैन यांचे लक्ष होते. पाकिटे वाटपाच्या कार्यात सोशल डिस्टन्सिंग, हात सॅनीटायझरने स्वच्छ करणे, मास्क व ग्लोज वापरणे याकडे लक्ष दिले जात होते. पाकिटांची एकूण संख्या 5.79 लाखांवर गेली.

 

लॉकडाऊन काळात महावीर जयंतीच्या दिवशी भोजन पाकिटात चुर्म्याचा लाडू देण्यात आला. त्यानंतर तीन वेळा आमरस दिला गेला. याशिवाय पावभाजी, वडापाव आणि शिरा देण्यात आला. या सर्व विशेष खाद्यपदार्थांची गुणवत्ता व चव याकडे लक्ष दिले गेले. जैन कुटुंबाच्या जेवणात जसे पदार्थ बनतात त्याच पद्धतीने वापराची सूचना स्वयंपाकी मंडळींना होती. त्यामुळे गरजवंतांनीही या भोजन पाकिटांचा नम्रतेने व आतुरतेने स्वीकार केला. 60 दिवसांमध्ये एक दिवसही नाही आणि तासाभराचाही नाही असा सेवेत खंड पडला नाही. दिलेल्या वेळा पाळल्या गेल्या. रोजची मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ झटपट साधला गेला. अशा प्रकारच्या भोजन यज्ञात 60 दिवसात 5 लाख 79 हजारावरील गरजुंचा जठराग्नी शांत झाला.

 

सहकार्याचा महामेरु

जैन उद्योग समुहाच्या भोजन पाकिट वाटप सेवेत सर्वाधिक विश्वासार्ह सेवा ही विविध स्वयंसेवी व सामाजिक संस्थांची राहिली. जळगाव शहर तसे दातृत्वाच्या बाबतीत सतत अग्रेसर असते. पण सार्वजनिक आपत्तीच्या काळात दातृत्वासोबत सहकार्याचा एक वेगळा महामेरु उभारला गेला. विविध संस्था-संघटनांची 200-225 कार्यकर्ते रोज निःस्वार्थपणे गरजुंपर्यंत भोजन पाकिटे द्यायला पळत होते. स्वतःचा वेळ, स्वतःचे इंधन खऱ्च करुन आणि सर्व प्रकारच्या वसाहतींमध्ये कोरोनाच्या संसर्गाला न घाबरता उन्हा तान्हात भोजन पाकिटे वितरीत केली जात होती. यात सचिन नारळे यांचे सार्वजनिक गणोशोत्सव महामंडळ, विराज कावडीया यांचे युवाशक्ती फौंडेशन, अमर जैन मित्र मंडळ, संजय भंन्साली यांचे जय आनंद ग्रुप, अभिषेक पाटील मित्र मंडळ, प्रतिभा शिंदे यांचे लोकसंघर्ष मोर्चा, विनोद देशमुख मित्र मंडळ, अशोक लाडवंजारी यांचे नाथ फौंडेशन, मनिष लुंकड यांचे युवाचार्य ग्रुप, रॉबिन हूड फौंडेशन, प्रहार जनशक्ती मोर्चा, शिवशक्ती फौंडेशन, नजरकैद फौंडेशन आदींचे कार्यकर्ते धावपळ करीत होते.

 

एक लाखांवर पुस्तिका वाटप

कोरोना १९ हा विषाणूजन्य आजार संपूर्ण जगासाठी अनोळखी आहे. त्याची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती व बचावाचे, सुरक्षेचे मार्ग, तज्ञाचे मत याविषयी माहिती देणारी कोविड १९ या शासकिय पुस्तिकेची १ लाख संख्येतील छपाई जैन उद्योग समुहाने जिल्हा प्रशासनाला करुन दिली. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातर्फे तयार केलेली पुस्तिका जळगावकरांपर्यंत पोहचावी असा विचार अशोक जैन यांनी केला. त्यानुसार त्यांनी, जिल्हाधिकाराऱ्यांचे सहकार्य व संदेश घेऊन पुस्तिका ढपाई केली. त्याचे वाटप शहरातील सर्व जळगावकरांपर्यंत करण्यात आले.

 

फवारणीसाठी अग्नीशमन वाहनाची व्यवस्था

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळावा म्हणून जळगाव शहरातील काही वॉर्डात सोडीयम हायड्रोक्लोरोक्विन फवारणीचे काम महापौर भारती सोनवणे व स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सुरु केले होते. त्यासाठी जैन उद्योग समुहाच्या एका फायर फायटरवर फवारणीसाठीची खास यंत्रणा तयार करण्यात आली. या फायर फायटर माध्यमातून जवळपास ३ लाख लोकांच्या वसाहतीत रसायन फवारणी झाली. जेथे जेथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तेथे रसायन फवारणीत फायर फायटर उपयुक्त ठरले.

गरजुंना शिधा वाटप


शहरातील गरजुंना भोजन पाकिटे वाटप सुरू असतांना समाजातील काही कुटुंबांना शिधा स्वरुपात साखऱ, तेल, डाळ, मसाले व इतर साहित्य जैन उद्योग समुहाकडून देण्यात आले.

ही तर समाजाप्रति कर्तव्य भावना …

लॉकडाऊन काळात जळगावमधील जवळपास पावणे सहा लाख लोकांना भोजन पाकिटे पोहचविण्याचे कार्य विविध संस्था-संघटनांच्या परिश्रम व सहकार्यातून पार पाडले. श्रद्धेय भवरलाल जैन यांनी उद्योगाच्या उभारणी, विस्तार आणि व्यवहारात समाजाप्रति नेहमी कर्तव्य आणि जबाबदारी निभावण्याचा संस्कार जैन कुटुंबिय आणि उद्योग परिवारातील प्रत्येक घटकाला दिलेला आहे. त्याच संस्कारातून आम्ही सर्वांनी एकत्रित कर्तव्य पार पाडले. उद्योग समुहात अडचणी आहेत. मध्यंतरी सरकारी कार्यवाहीच्या फेऱ्यातून जावे लागले. कर्मचाऱ्यांचे वेतन थकलेले आहे, अशा स्थितीत जैन उद्योग समुह समाजाप्रति कशाला तोशीश लावून घेतो, अशा टीका होऊ शकते. आज त्याचा विचार करण्याची गरज नाही. कारण ज्या मातीत आणि ज्या समाजात आपण काम करतो, त्या समाजातील माणसे ही आपली माणसे आहेत. आज त्यांना सावरण्यासाठी आपण आपले कर्तव्य निभावले पाहिजे हाच संस्कार, विचार घेऊन आम्ही कृती केली आहे.

– अशोक भवरलाल जैन
अध्यक्ष, जैन उद्योग समुह, जळगाव

Protected Content