दुधफेडरेशनच्या रेल्वे गेटजवळ तरूणाला बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजमालती नगरातील मंगेश सुभाष काजवे (वय-२४) या तरूणाला काहीही कारण नसतांना दुधफेडरेशनजवळील रेल्वे गेटजवळ काही तरूणांनी लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल शनिवारी २४ जुलै रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी आज रविवारी २५ जुलै रोजी दुपारी नऊ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मंगेश सुभाष काजवे हा दुचाकीने काल शनिवारी २४ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतून एसएमआयटी कॉलेजकडे जाण्यासाठी निघाला. रस्त्यावर सुरत भुसावळ रेल्वे गेट बंद असल्यामुळे मंगेश दुचाकीसह थांबला होता. त्यावेळी मंगेशला एकटा पाहून संशयित आरोपी जानू संजू पटेल, संजू बिस्मिल्ला पटेल, महेमूद बिस्मिल पटेल, रिजवान गफुर पटेल, जुनेद गफुर पटेल, आवेश राजू पटेल, जास्मिन राजू पटेल, शोएब संजू पटेल, जुबेर शेख (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. दुधफेडरेशन जवळ राजमालती नगर जळगाव यांनी काहीही कारण नसतांना मंगेशला लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केली. यात मंगेश गंभीर जखमी झाला. तर यातील संशयित आरोपी जुनेद गफुर पटेल याने मंगेशच्या खिश्यातील ७३० रूपये काढून घेतले. तर जानू पटेल याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या मंगेश काजवे याला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. शहर पोलीसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज रविवारी २५ जुलै रोजी दुपारी मंगेशचा जबाबत नोंदवून घेतला. जबाबावरून शहर पोलीस ठाण्यात संशयित नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे. 

Protected Content