महापूरग्रस्तांसाठी आ. गिरीश महाजन यांचा मदतीचा हात

जळगाव प्रतिनिधी | चिपळूण आणि महाड येथील महापूरग्रस्तांच्या मदतीसाठी तेथे ठाण मांडून बसलेले माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांनी आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार्‍या दहा हजार किटची मदत करण्याचे नियोजन केलं आहे.

याबाबत वृत असे की, सध्या कोकणात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडालेला आहे. विशेष करून चिपळूण आणि महाड तालुक्यात यामुळे मोठा फटका बसला आहे. महापूराची आपत्ती कोसळल्यानंतर माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर आणि आ. निरंजन डावखरे यांच्यासह थेट महाड तालुका गाठला. तेथून प्रशासनाची मदत येण्याआधी दरड कोसळून हाहाकार उडालेल्या तळिये गावात त्यांनी मदतकार्य सुरू केले.

दरम्यान, आमदार गिरीश महाजन हे महापूरग्रस्तांची मदत करण्यासाठी महाड येथे ठाण मांडून बसले आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात येणार्‍या मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. प्रशासनातर्फे करण्यात येणारी मदत ही अतिशय तोकडी असल्यामुळे आ. गिरीश महाजन यांनी त्यांच्यातर्फे महापूरग्रस्तांना दहा हजार किटची मदतघची तयारी सुरु केली आहे. या किटमध्ये एका कुटुंबाला एक महिला पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

सोमवारी सायंकाळी जळगाव येथील जीएम फाऊंडेशनच्या कार्यालयातून हे साहित्य महाड आणि चिपळूण येथे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती आ. गिरीश महाजन यांचे जनसंपर्क कार्यालययांनी दिली आहे.

Protected Content