जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | असावा नगर येथील कुमारी देवेश्री भूपेंद्र बुंदेले यांनी ७२ % गुणांनी घवघवीत यश प्राप्त करून वकील झाल्याबद्दल मंडळाचे उपाध्यक्ष रमेश पाटील ( माजी सैनिक सिग्नल आर्मी ) व धर्मपत्नी स्वाती पाटील उभयतांच्या शुभहस्ते शाल आणि बुके देऊन हृद्य जाहिर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईश्वरसिंग पवार ( निवृत्त मुख्य प्रबंधक,बँक ऑफ बडोदा ) असून प्रमुख अतिथी सत्कारार्थी सोबत ॲडव्होकेट देवश्री बुंदेले यांच्या आजी सिंधू सुतार व मामाश्री निवृत्त शिक्षक विजय लुल्हे ,उपाध्यक्ष बाळू पाटील प्राध्यापिका श्वेता पाटील (न्यू इंग्लिश स्कूल,जामनेर )मंगल कुलट ( संचालिका सौंदर्या ब्युटी पार्लर ),ललिता भदाणे मान्यवर उपस्थित होते.सत्काराने भारावून सद्गदीत झाल्याने देवेश्री व आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ! सत्काराच्या भावनिक परमानंदाने देवेश्री मनोगत देऊ शकल्या नाहीत!
कुमारी ॲडव्होकेट देवेश्री बुंदेले यांनी एस.एस.मणियार लॉ कॉलेज,जळगाव येथून शिक्षण घेतले.कोविड काळात 29 सप्टेंबर 2021 रोजी क्रूर काळाने मातृछत्र हिरावून घेतले.वडिल चार वर्षांपूर्वीच पोरके करून गेले ! मातृ-पितृछत्र नसतांनाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत देवेश्री यांनी यश प्राप्त केले.आजोबा निवृत्त मुख्याध्यापक सुपडू सुतार व आजी सिंधु सुतार यांनी प्रेमपूर्वक सर्वतोपरी सहारा दिला. आजोबाही दि .18 एप्रिल 2021 रोजी स्वर्गवासी झाले ! देवेश्री यांनी अदम्य जिद्दीने आईची स्वप्नपूर्ती केली.परंतु यशपूर्तीचा आनंद व शुभाशिर्वाद देण्याला प्रिय मातोश्री व आजोबा हयात नाहीत ते देवाला यापूर्वी प्रिय झाले ! देवेश्री यांना नृत्य ,नाट्य ,चित्रकला व वक्तृत्व यात विशेष रुची आहे . त्यांनी कॉलेजातील स्पर्धेत अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत.
कॉलनीतील गुणवंत विद्यार्थी ध्रुव बाळू पाटील याने मॅथ ऑलम्पियाड मध्ये इयत्ता चौथीत यश प्राप्त केल्याबद्दल धृवचा सत्कार भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . त्याप्रसंगी ध्रुवचे मातापिता बाळू पाटील ( मंडळाचे उपाध्यक्ष ), मातोश्री रेखा पाटील उपस्थित होते.
गणपती उत्सव अंतर्गत स्वर्गीय पिताश्री सुपडू सुतार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा व ज्येष्ठांसाठी श्रीगणेश रेखाटन चित्रकला स्पर्धा घेण्यात येईल असे विजय लुल्हे यांनी यानिमित्त जाहीर केले.तसेच प्रख्यात बालसाहित्यिका तथा अभ्यासक्रमिक कवयित्री माया धुप्पड यांचे “मनमोर ” काव्यचित्र प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येईल असे विजय लुल्हे यांनी जाहीर केले. भक्ती आणि श्रद्धेला विविध कलागुणांची स्पर्धात्मक वातावरण निर्मिती करून लहानथोरांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून कलासंवर्धन करण्याचे भावनिक आवाहन विजय लुल्हे यांनी मनोगतातून व्यक्त केले.
प्रथा परंपरेनुसार दैनिक महाआरतीचे मानकरी ईश्वरसिंग पवार व धर्मपत्नी लता पवार उभयतांनी गणेश पूजन करून साग्रसंगीत सामुहिक महाआरती केली. महाआरती प्रसंगी संध्या भदाणे,जनाबाई पाटील, सुरेखा येवस्कर,सुनंदा पाटील, सुवर्णा पाटील, पाटील,भाग्यश्री जाधव,भावना जैन,अनुष्का कुलट यांसह केतन, स्वरितसिंग,राहुल,पियुष, भावेश,स्वामी,सार्थक,जश ही गुणी तेवढीच खट्याळ व उत्साही गणेशभक्त बच्चे कंपनी बहुसंख्येनेउपस्थित होते.