जिल्ह्यास मिळाले ७६० रेमडेसिवीर इंजेक्शन्स- जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासाठी आज ७६० रेमडिसिवीरचे इंजेक्शन्स मिळाले असून याचे आवश्यकतेनुसार खासगी हॉस्पीटल्सला वितरण करण्यात आल्याची माहिती आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

आज (24 एप्रिल) रोजी जिल्ह्याला 760 रेमडेसिवीर इंजेक्शनच्या व्हायल्स प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कोविड उपचार करणा-या 117 खाजगी रुग्णालयांना ऑक्सीजन बेडच्या संख्येनुसार 315 रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्स या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सला वितरीत करण्यात आल्या आहेत. तर 19 कोविड हाॅस्पिटलला 436 व्हायल्स कंपनीकडून घाऊक विक्रेत्यांमार्फत परस्पर वितरण होत आहे. तर प्राप्त साठ्यापैकी 10% साठा हा फ्रंटलाईन वर्कर्ससाठी राखीव ठेवण्यात येत आहेत.

संबंधित कोविड रूग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रूग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय, वाजवी दरात करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थेट साठा उपलब्ध होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध कार्यालय येथे २४ X ७ रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात भरारी पथके प्रांताधिकारी व तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली असून त्यांचेमार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडेसिवीरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यासोबतच महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन व नगर पंचायतसह आयुक्त औषध व प्रशासन यांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकारी यांनी नियंत्रण करणेबाबतही सुचना देण्यात आल्या आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये याकरीता दररोज प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे रूग्णालयनिहाय वाटप करण्यात येवून केलेल्या वाटपाची हॉस्पिटलनिहाय रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी तयार करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

Protected Content