राज्य शासनाच्या निषेधार्थ आ. मंगेश चव्हाण करणार मुंडण ! (Video)

जळगाव प्रतिनिधी । महावितरणच्या अभियंत्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटकेनंतर आज जामीन झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली राज्य शासनाविरूध्दची लढाई कायम राहणार असून आपण उद्या मुंडण करणार असल्याची माहिती दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील सुमारे सात हजार वीज जोडण्या तोडण्यात आल्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्‍यांसह जळगाव वीज परिमंडळाच्या कार्यालयात धडक दिली होती. येथे अधिक्षक अभियंता फारूक शेख यांना दोराने बांधून बांधावर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच परिमंडळ कार्यालयास कुलूप ठोकले होते. यामुळे मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभियंता फारूक शेख यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर भारतीय दंड विधान कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ३५१, २९४, २६९, १८८, मुंबई पोलिस कायदा कलम १३५ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पहिल्यांदा पोलीस कोठडी तर नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज सादर केला होता. यावर सोमवारी सुनावणी पूर्ण झाली होती. तर मंगळवारी न्यायालयाने त्यांच्यासह इतर सर्वांना जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण आणि इतरांसह ३१ जणांची आज जिल्हा कारागृहातून मुक्तता करण्यात आली.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, आम्ही महावितरणच्या अभियंत्यांना वैयक्तीक आकसापोटी नव्हे तर शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांना वस्तुस्थीतीची जाणीव करून दिली होती. मात्र आमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. आम्ही कायद्याचा सन्मान करत असल्याने हे देखील मान्य केले. मात्र आम्हाला १२ दिवस अतिशय वाईट वागणूक मिळाली. तर शेतकर्‍यांच्या समस्या अजूनही संपलेल्या नाहीत. यामुळे आपण उद्या सरकारचे तेरावे साजरे करणार आहोत. यासाठी आपण स्वत: शेतकर्‍यांसह मुंडण करत राज्य शासनाचा निषेध करू. राज्य सरकार विरूध्दची आपली लढाई कायम राहणार असल्याचे प्रतिपादन देखील आमदर चव्हाण यांनी याप्रसंगी केले.

खालील व्हिडीओत पहा आमदार चव्हाण नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/467679824454996

Protected Content