लाभार्थ्यांना प्रशिक्षण न देताच लाटले लाखो रुपये : दोघांविरोधात गुन्हा दाखल

 

यावल,  प्रतिनिधी । येथील आदीवासी एकात्मीक विकास कार्यालयामार्फत आदीवासी युवक युवती लाभार्थी यांना शिलाई मशीन प्रशिक्षण देण्याच्या नांवाखाली लाखो रुपयात फसवणुक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून , याबाबत  सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्या तक्रारीवरून यावल पोलीसात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल येथील आदीवासी एकात्मीक विकास कार्यालयाच्या माध्यमातुन दिनांक ४ मार्च  २०१४ ते २८ सप्टेंबर  २०१७ या कालावधीत औरंगाबाद येथील क्रांतीज्योती प्रमिलाजी चव्हाण महीला मंडळ या संस्थेस अटीशर्तीच्या अधिन राहुन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी आदीवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत ११८ आदीवासी युवक युवतींना३ महीन्यांच्या प्रशिक्षणासाठी ९ हजार ७०० प्रत्येकी  लाभार्थीच्या प्रशिक्षणासाठी ११ लाख ४४ हजार ६ooरुपये या संस्थेला देण्यात आले होते. 

प्रत्यक्षात मात्र या संस्थेच्या वतीने आदीवासी युवक युवतींना कोणतेही प्रशिक्षीताकडुन कोणतेही प्रशिक्षण न देता शिलाई मशीन न देता व कुठलेही प्रमाणपत्र न देता एक दिवस शाळेची निवड करून एका हॉलमध्ये लाभार्थ्यांना बसवुन त्यांचे फोटो काढुन कुठलेही प्रशिक्षण न देता गोरगरीब आदीवासी लाभार्थ्यांची फसवणुक केली आहे.  या संदर्भात आदीवासी एकात्मीक विकास कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नामदेव भुर्जगरांव झंपलवाड (वय ५२ वर्ष) यांनी यावल पोलीसात क्रांतीज्योत प्रमिलाजी महीला मंडळ औरंगाबाद या संस्थेच्या सचिव चंद्रकला शिवाजी जाधव (रा. लोहारा पोस्ट मंगरूळ तालुका मानवत जिल्हा परभणी) व शिवाजी रमेश जाधव (रा. दक्षीण विहार अपार्टमेंट कांचनवाडी , पैठण रोड, औरंगाबाद) यांनी संगनमताने आदीवासींना कुठलेही प्रशिक्षण न देता शासकीय निधीचा गैरव्यवहार करून शासनाची व आदीवासीची फसवणुक केली म्हणुन यावल येथे या दोघा विरूद्ध भादवी कलम ४२०, ४०६ , ४६५ , ४६८ , ४७१ , ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस कर्मचारी संजय तायडे हे करीत आहे .

 

Protected Content