धरणगाव पालिका पोटनिवडणूक : भाजपकडेही तगडे उमेदवार असल्यामुळे आशा उंचावलेल्या !

7c774c71 0113 4765 96c9 51154924ca9f

 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपची आज सायंकाळी बैठक होत आहे. गतवेळी आपला उमेदवार अवघ्या काही मतांनी पराभूत झाल्यामुळे यावेळी भाजपच्या आशा उंचावलेल्या आहेत. या वृत्तातून भाजपातील संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या जमेच्या बाजू आम्ही येथे वाचकांसाठी देत आहोत.

 

धरणगाव नगरपालिकेत आजच्या घडीला १४ नगरसेवक शिवसेनेचे तर ६ नगरसेवक भाजपचे आहेत. पालिकेत भाजपचा विरोधी पक्ष नेता आहे. आजच्या संजय महाजन यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांच्या नेतृत्वातच धरणगाव पालिकेत शून्यावरून ६ जागांवर भाजपला विजय मिळविता आला होता. तर त्यांचा अवघ्या ८० मतांनी पराभव झाला होता. पराभव झाल्यानंतरही महाजन यांनी आपला जनसंपर्क कमी होऊ दिला नाही. तसेच पराभवबद्दलही त्यांनी कुणाकडे नाराजी बोलून दाखली नाही. त्यामुळे धरणगावकरांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड सहानभूती आहे. महाजन आजही शहरातील प्रत्येक जाती-धर्माच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत असतात. महाजन हे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. विशेष करून त्यांच्या भाषणांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. अगदी शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्या प्रमाणे त्यांचे भाषणही प्रचंड आक्रमक असते. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेला संजय महाजन हे त्याच आक्रमक पद्धतीने उत्तर देऊ शकतात. संजय महाजन हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. गतवेळी फडणवीस यांनी संजय महाजन यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. या सभेत फडणवीस यांनी महाजन आणि माझ्यात कुणीही मध्यस्थ नाहीय. महाजन हे थेट माझ्या संपर्कात असतील,असे सांगितले होते. संजय महाजन यांची मुस्लीम समाजासह शहरातील सर्वच छोट्या-मोठ्या समाजामध्ये चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे महाजन यांनी नकार दिल्यानंतरच भाजपच्या गटातून दुसऱ्या उमेदवारांचा विचार होणार आहे.

 

संजय महाजन यांनी नकार दिला तर सर्व प्रथम पालिकेतील गटनेते कैलास माळी सर यांच्या नावावर भाजप करणार आहे. कैलास माळी हे शिक्षक असल्यामुळे शहरातील बहुतांश पालकांशी थेट परिचय आहे. विविध समाजातील संत, राष्ट्रपुरुषांच्या मिरवणुकीत माळी सर यांचा सक्रीय सहभाग असतो. माळी सर सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून शहराला परिचित आहेत. मोठा माळी वाडा परिसराचे ते प्रतिनिधित्व करत असल्यामुळे शहरातील इतर भागातही त्यांना मान्यता आहे. शांत, संयमी स्वभावामुळे कैलास माळी सर यांचे सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यामुळे पक्षश्रेष्ठी कैलास माळी यांच्या नावावर विचार करू शकतात.

 

माजी उपनगराध्यक्ष नूतन दिलीप पाटील ह्या भाजपच्या दृष्टीने सक्षम उमेदवार आहेत. या आधीही नूतन पाटील या दोन वेळेस नगरसेविका म्हणून निवडणून आलेल्या आहेत. त्या सिनेट सदस्य दिलीप पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत. नगरसेविका असतांना नूतन पाटील यांचा विकास कामांच्या माध्यमातून चांगला जनसंपर्क होता. दिलीप पाटील यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी कौटुंबिक संबंध असल्यामुळे अनेक जण नूतन पाटील यांना छुपी किंवा उघड मदत करू शकतात. दिलीप पाटील हे माजी पालकमंत्री तथा विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विद्यार्थी परिषदेपासूनचे जुने मित्र आहेत. त्यामुळे नूतन पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास चंद्रकांत पाटील हे या निवडणुकीत लक्ष घालू शकतात.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पुनिलाल महाजन यांना भाजप उमेदवारी देऊन राष्ट्रवादीला अडचणीत आणू शकते. कारण पुनिलाल महाजन हे राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन यांचे बंधू आहेत. पुनिलाल महाजन यांच्या पत्नी या नगरसेविका होत्या. त्यामुळे पालिकेच्या राजकारणाचा पुनिलाल महाजन यांनाही चांगला अनुभव आहे. महाजन परिवाराचे पालिकेच्या राजकरणात मोठे वलय आहे. माळी समाजात पुनिलाल महाजन यांची प्रतिमा चांगली आहे. तसेच शहरात त्यांचे नातेगोते मोठे आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटातून भाजपात दाखल झालेले माजी नगरसेवक मधुकर रोकडे हे देखील भाजपच्या दृष्टीने एक सक्षम उमेदवार आहेत. रोकडे यांचा मोठ्या माळीवाड्यासह शहरातील प्रत्येक भागात मोठा जनसंपर्क आहे. शहरात कुठेही भंडारा किंवा धार्मिक कार्यक्रम असल्यास रोकडे यांचा सक्रीय सहभाग असतो. रोकडे यांचा स्पष्टवक्ते स्वभावामुळे ते अनेकदा चर्चेत राहतात. पालिका कारभाराचा अनुभव असल्यामुळे ते एक चांगले उमेदवार ठरू शकतील, असा भाजपचा अंदाज आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीच्या गोटातून भाजपात घरवापसी केलेले, वसंतराव भोलाणे हे देखील भाजपच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण उमेदवार ठरू शकतात. भोलाणे हे तेली समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व असल्यामुळे भाजप त्यांच्या नावावर गांभीर्याने विचार करू शकते. दुसरीकडे शिवसेनेला निवडणूक काळात आर्थिकदृष्ट्या भोलाणे जोरदार टक्कर देऊ शकतात. त्यांच्या धर्मपत्नी चंद्रकला भोलाणे या देखील नगरसेविका राहून चुकल्या आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात त्यांचा जनसंपर्क आहे. भाजपचे विद्यमान नगरसेवक ललित येवले हे देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. येवले हे चंद्रशेखर अत्तरदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. युवा चेहरा म्हणून भाजप येवले यांचा विचार करू शकतात.

Protected Content