सामान्यांना कांदा रडवतोय ; दर १२५ रुपये किलो

kanda

नाशिक प्रातिनिधी । अवकाळी पावसामुळे राज्यात आणि देशात इतरत्रही अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. कांदाच्या पिकावरही पावसाने पाणी फेरल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दराचे नवनवीन विक्रम करणाऱ्या उन्हाळ कांद्याने तब्बल साडेबारा हजारांचा आजवरचा विक्रमी दर नोंदवला आहे. तर किरकोळ बाजारात ग्राहकांना प्रतिकिलोला सव्वाशे रुपये मोजावे लागत आहेत.

शेतकऱ्यांसाठी अनपेक्षित धनाची पेटी ठरलेला कांदा आता सामान्य ग्राहकांच्या डोळ्यांतून अश्रू आणत आहे. आधी हॉटेलांतून, नंतर भज्यांमधून आणि आता भाजीमधूनही कांदा हद्दपार होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यांपासून जनसामान्यांना रडविणाऱ्या कांद्याने सोमवारी (दि. २) तब्बल दोन हजार रुपयांची विक्रमी उसळी घेतली. लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला तब्बल नऊ वर्षांनी प्रतिक्विंटलला ८,६५५ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. यापूर्वी डिसेंबर २०१० मध्ये लाल कांद्याला ६,२९९ रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला होता. सोमवारी उमराणे बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटलला आजवरचा सर्वोच्च १२ हजार ५०१ रुपयांचा दर मिळाला. कळवण येथेही ११ हजारांचा भाव मिळाला. उत्पादन कमी आणि आवकही घटल्याने मागील तीन दिवसांत बाजार समितीत कांद्याचे दर सरासरी दीड ते दोन हजारांनी वाढले आहेत. परिणामी, किरकोळ बाजारातील दर किलोला सव्वाशे रुपयांपर्यंत पोचल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी डोळ्यांत तरळले आहे.

Protected Content