चक्रीवादळाचा फटका: पुणे जिल्ह्यातील तब्बल ५४० वीज वाहिन्यांचा पुरवठा खंडीत

पुणे वृत्तसंस्था । पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या चक्रीवादळाच्या थैमानात वीज यंत्रणा विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. अनेक ठिकाणी वादळात विजेचे खांब उन्मळून पडले, तर काही ठिकाणी मोठमोठी झाडे वीजयंत्रणेवर कोसळली. यात पुण्यातील जवळपास ५४० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडल्याची प्राथमिक माहिती आहे.

दुसरीकडे वादळाच्या पार्श्वभूमीवर मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील ३४० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. संभाव्य नुकसानीचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. पुणे शहराच्या विविध भागात आणि पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात महावितरणच्या वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप याची निश्चित माहिती मिळणे बाकी असून गुरुवारी (४ जून) सायंकाळपर्यंत हे स्पष्ट होईल असा अंदाज आहे. महावितरणचे सर्व अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामं करत आहेत. आज रात्री उशिरापर्यंत खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु राहणार आहेत.

मावळ, खेड तालुक्यांमधील राजगुरुनगर, चाकण, वडगाव, तळेगाव, लोणावळा या परिसरातील ८२ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यासह जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील भीमाशंकर, घोडेगाव, नारायणगाव, जुन्नर, पिंपळवंडी, नारायणगाव, नाणेघाट, मंचर, डिंभे, आपटाळे, ओतूर, आळेफाटा या परिसरातील सर्व २१५ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील बंद ठेवण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वादळासह पावसाचे थैमान सुरु असल्याने वीजवाहिन्या पूर्ववत करण्याच्या कामात काही अडथळे येत होते. त्यामुळे अद्याप या भागातील वीज खंडीतच आहे.

पिंपरी चिंचवड व भोसरीमध्ये वादळी पावसामुळे वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा बंद झाला होता. पिंपरी, चिंचवड, भोसरी, रावेत, आकुर्डी, मोशी, चऱ्होली, सांगवी, वाकड, बिजलीनगर, खराळवाडी, पिंपळे सौदागर या भागांतील जवळपास ११२ वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्याने वीजपुरवठा बंद झाला.

पुणे शहरात वादळी पावसामुळे ८५ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. यामध्ये रास्तापेठ, एनआयबीएम रोड, खडी मशीन चौक, कोंढवा, उंद्री, येवलेवाडी, वानवडी, गुरुवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, धायरी, रामटेकडी, मुंढवा, हडपसर, मगरपट्टा, पिसोळी, केशवनगर, महंमदवाडी, कोरेगाव पार्क, कोथरूड, शिवणे, वारजे परिसर, गांधीभवन परिसर, बिबवेवाडी, धनकवडी, तळजाई पठार, अंबिकानगर, भिलारेवाडी, गंगाधाम रोड, कात्रज इत्यादी भागांचा समावेश आहे.

Protected Content