नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ३५६ वर; दिवसभरात ५८ रूग्णांची वाढ

नाशिक वृत्तसंस्था । नाशिक जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात काल ३ जून दिवसभरात ५८ रुग्णांची वाढ झाली आहे. तर दोघांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ९०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाचा वाढत आकडा हा नाशिककरांसाठी धोकादायक आहे. जिल्ह्यातील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. पण आता मालेगावनंतर नाशिक शहरातही रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासन हादरले आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ३५६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ९०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

राज्यातही काल दिवसभरात २ हजार ५६० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ९९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह महाराष्ट्रातील कोरोनाबधितांचा आकडा ७४ हजार ८६० वर पोहोचला आहे. यापैकी ३२ हजार ३२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ३९ हजार ९३५ सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Protected Content