दरेकरांची नवाब यांच्या राजीनाम्याची मागणी

 

 

मुंबई:  वृत्तसंस्था । नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

 

महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळू नये म्हणून केंद्र सरकारकडून कंपन्यांना धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आव्हान दिलं आहे.

 

मलिक यांनी अत्यंत खालच्या दर्जाचे स्टेटमेंट केले आहे. रेमडेसिवीर देण्यात राज्य सरकारच अपयशी ठरले आहे. ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत. त्यामुळे स्वत:चं अपयश झाकण्यासाठी नवाब मलिक आरोप करत आहेत. इतर राज्यातील कंपन्या रेमडेसिवीर देण्यास तयार आहेत. एफडीएचे अधिकारी काळे यांनी तसा या कंपन्यांशी पत्रव्यवहार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्र न् दिवस बैठका घेऊन काम करत आहेत. इकडे मलिक एक बोलत आहेत तर आरोग्य मंत्री राजेश टोपे दुसरंच बोलत आहेत. राजकीय उद्देशानेच केवळ बोललं जात आहे. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खालल्या जातंय, असं सांगतानाच मलिक यांनी नुसते आरोप करू नयेत. राजकीय स्टंटबाजी करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. त्यांनी पुरावे द्यावेत. अन्यथा राजीनामा देऊन माफी मागावी, असं दरेकर म्हणाले. मलिकांनी पुरावे दाखविल्यास आम्ही महाराष्ट्राची माफी मागू, असंही ते म्हणाले.

 

नागरिकांना तातडीने ऑक्सिजन उपबलब्ध करून देण्याची गरज आहे. हे पाच दिवस खूप महत्त्वाचे आहेत. ऑक्सिजनसाठी लोक धावत आहेत. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं तेव्हा ऑक्सिजन उपलब्ध झालं. नाही तर 63 रुग्ण जीवाला मुकले असते. ठाणे आणि मिराभाईंदरमध्ये तिच परिस्थिती आहे. अन् प्रत्येक गोष्टीचं खापर मात्र केंद्रावर फोडलं जातंय, असं ते म्हणाले.

 

केंद्र सरकार सर्व काही करत आहे. राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करणार आहात. हाफकिनसाठी केंद्राने परवानगी दिली. जे पाहिजे ते दिलं जात आहे. पण सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे नियोजनाचा बोजवारा उडत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी मी बोललो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही बोलत आहेत. तरीही असे आरोप केले जात आहे. स्वत: राजेश टोपेच ऑक्सिजन साठा संपल्याचं सांगत आहेत. रेमडेसिव्हीर नसल्याचं सांगत आहेत. मग नुसतेच कोविड सेंटरचे सांगाडे उभे करून काय फायदा? असा सवालही त्यांनी केला.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. त्यावरही दरेकर यांनी भाष्य केलं. लोकांना काय हवंय, तुम्ही काय मागितलं हे सांगितलं जात नाही. आमचं बोलणं झालं नाही एवढंच विधान केलं जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Protected Content