जळगाव प्रतिनिधी । भारत विकास परिषदेतर्फे बालिका सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले असून आज याची सांगता करण्यात आली.
भारत विकास परिषद ही संस्था अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेली समाजसेवी संस्था आहे. संपर्क सहयोग संस्कार सेवा व समर्पण हे परिषदेच्या कामाचे मुख्य आयाम आहेत. परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.अॅनिमियामुक्त भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ या दोन अभियानांच्या अंतर्गत परिषदेने बालिकांचे शिक्षण व आरोग्य विषयात भरीव काम केले आहे.
दरम्यान, परिषदेतर्फे बालिका दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंद भारत विकास परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे बालिका सप्ताहाचे आयोजन ‘बेटी है तो सृष्टी है’ या संकल्पनेवर करण्यात आले होते .या सप्ताहातील कार्यक्रम भारतभरातील परिषदेच्या सर्व शाखांत एकाचवेळी साजरे झाले.
या सप्ताहानिमित्त-
* दि .१७ जानेवारी रोजी १० ते १८ या वयोगटातील मुलींची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली .
* दि.१८ जानेवारी रोजी अॅनिमिया असलेल्या मुलींना लोहयुक्त आहार व लोहाच्या गोळ्या वाटप केल्या गेल्या.
* दि .१९ रोजी गरजू मुलींना स्टेशनरी वाटप केले गेले
* दि .२० रोजी शाळकरी मुलींना स्टोल व मास्कचे वाटप करण्यात आले.
* दि .२१ रोजी परिषदेच्या परिवारातील मुलींकरता मनोरंजनपर कार्यक्रमांचे ऑनलाईन आयोजन केले गेले.
या सप्ताहाचा समारोप रविवार दिनांक २४ रोजी ऑनलाईन कार्यक्रमाने परिषदेच्या दिल्ली येथील मुख्यालयात झाला .या कार्यक्रमात भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय पदाधिकारी, रिजनल, प्रांतीय तसेच शाखीय पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक विभागातील सर्वोत्कृष्ट कार्यक्रम निवडून या कार्यक्रमातून सादरीकरण केले गेले, ते देशभरातील सदस्यांपर्यंत पोचले.
देशभरात बालिकांचे शिक्षण आरोग्य व आत्मनिर्भरता याविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने हा सप्ताह केला गेला. भारत विकास परिषद जळगांव शाखेच्या महिला संयोजक सौ जान्हवी खाडिलकर, शाखेच्या उपाध्यक्षा सौ राधिका नारखेडे तसेच सर्व महिला सदस्यांनी सर्व कार्यक्रमांचे उत्साहाने नियोजन केले.
बालिका सप्ताह नियोजनात शाखा अध्यक्ष उज्वल चौधरी, सचिव डॉ योगेश पाटील, आणि भा वि प देवगिरी प्रांताध्यक्ष श्री तुषार तोतला ह्यांनी विशेष सहकार्य केले.