जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून आज येथे मिलेट दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याला उदंड प्रतिसाद लाभला.
यंदा जागतिक पातळीवर पौष्टीक तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. या अनुषंगाने राज्याच्या कृषी खात्यातर्फे भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. याच्याच अंतर्गत आज जळगाव येथे मिलेट दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जळगाव रनर्स ग्रुप आणि खान्देश सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कृषी खात्याचे संयुक्त संचालक मोहन वाघ, उपसंचालक अनिल भोकरे यांच्यासह कृषी अधिकारी व कर्मचारी, जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य तसेच नागरिकांची उपस्थिती लाभली. प्रारंभी संगीताच्या तालावर वार्म अप करण्यात आला.
याप्रसंगी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी आपल्या मनोगतातून तृणधान्ये हे नियोगी जीवनासाठी आवश्यक असून याचा दैनंदिन आहारात समावेश असावा असे आवाहन केले. तर जागतिक तृणधान्य वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यानंतर स्पर्धेस प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कृषी कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचार्यांनी सहकार्य केले.