मंत्रीमंडळ विस्तार लवकरच : जिल्ह्यात दोघा मातब्बरांना संधी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येत्या दोन दिवसात राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून यात पहिल्या टप्यातील मोजक्या मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांचा समावेश असेल हे जवळपास निश्‍चीत झाले आहे.

सुप्रीम कोर्टात उद्या राज्यातील सत्ता संघर्षावर निर्णायक निकाल येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हा निकाल लागल्यानंतर दोन दिवसात अर्थात ५ ऑगस्ट रोजी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून यात पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे मोजके मंत्री शपथ घेणार आहेत. यात भाजपचे पाच तर शिंदे गटाचे सात आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील असे मानले जात आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार आणि शंभुराज देसाई हे शपथ घेण्याची शक्यता आहे. तर भाजपतर्फे चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, आशीष शेलार आणि प्रवीण दरेकर हे शपथ घेणार असल्याचे समजते.

जळगाव जिल्ह्यातून माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन आणि माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आ. गुलाबराव पाटील हे पहिल्याच टप्प्यात शपथ घेणार असल्याने त्यांना चांगली खाती मिळतील हे अपेक्षित मानले जात आहे.

Protected Content