मंदिरात गेले आणि प्रसाद संपला : महाजनांनी खडसेंना डिवचले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ”खडसेंच्या आजच्या अवस्थेबाबत पंगतमधल्या बुंदीची उपमा दिली जात असली तरी आपल्याला हे मान्य नसून त्यांची अवस्था मंदिरात गेले आणि प्रसाद संपला !” अशी झाल्याचा टोला आ. गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांना मारला.

एकनाथराव खडसे हे विधानपरिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळेल असे स्पष्ट झाले होते. मात्र त्यांच्या विजयाला काही तास उलटत नाही तोच राज्यात राजकीय भूकंप होऊन सरकार बदलले. यामुळे साहजीकच त्यांच्या समर्थकांचे स्वप्न भंग पावले. यातून मुक्ताईनगर मतदारसंघातून पंगतीला बसले आणि बुंदी संपली अशा पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या. आणि काही दिवसातच संपलेली बुंदी म्हणत त्यांची खिल्ली उडविण्यात आली. अगदी परवा आमदार चंद्रकांत पाटील हे मतदारसंघात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी बुंदीचे वाटप करून अजून यात भर टाकली.

दरम्यान, माजी मंत्री तथा खडसेंचे कट्टर विरोधक असणारे आ. गिरीश महाजन यांनी मात्र आज थोडा वेगळाच सूर लावला. ते म्हणाले की, त्यांच्या बाबतीत पंगतीला बसले आणि बुंदी संपली असे म्हटले जाते. माझ्या मते मात्र ते मंदिरात गेला आणि प्रसाद संपला, तर मंदिराबाहेर आले आणि चप्पल चोरीला गेली अशी खडसे यांची स्थिती झाल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली.

आमदार महाजन पुढे म्हणाले की, आपण महाविकास आघाडीत मंत्री बनू असे स्वप्न एकनाथ खडसे यांनी पाहिले होते. तथापि, त्यांना आता आमदारकीवरच समाधान मानावे लागणार आहे. त्यांनी विधानपरिषदेची शपथ घेतली असून त्यांच्या आगामी वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा असल्याचेही गिरीश महाजन म्हणाले.

Protected Content