Home आरोग्य मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पीटलमध्ये हृदयरोग शिबीर

मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पीटलमध्ये हृदयरोग शिबीर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावातील महादेव हॉस्पीटलमध्ये आयोजित करण्यात आलेले भव्य हृदयरोग तपासणी शिबिर नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे. ‘हृदयरोग मुक्त जिल्हा अभियान’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला अल्पावधीतच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अत्याधुनिक हृदयरोग विभाग आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या तत्पर सेवेमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत आहे.

मंत्री गिरीष महाजन यांनी आपला वाढदिवस सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रमांद्वारे साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत महादेव हॉस्पीटलचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी पुढील एक महिनाभर मोफत हृदयरोग तपासणी शिबिर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या शिबिरात नागरिकांना २डी इको, ईसीजी, एन्जिओग्राफी तसेच एन्जिओप्लास्टी संदर्भातील तपासण्या आणि तज्ज्ञांचा सल्ला मोफत उपलब्ध करून दिला जात आहे.

दररोज सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू असलेल्या या शिबिरात अवघ्या तीन दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. अनेक रुग्णांना पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन देण्यात आले असून, योजनेअंतर्गत २५ रुग्णांवर तातडीने मोफत उपचार करण्यात आले आहेत. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यामुळे अनेक रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रसिद्ध डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांची टीम रुग्णसेवेसाठी कार्यरत आहे. अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, अचूक निदान प्रणाली आणि तत्पर उपचार पद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळत आहे. विशेषतः हृदयरोगासारख्या गंभीर आजारांमध्ये वेळेवर उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि महादेव हॉस्पीटल ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथे सुरू असलेल्या महादेव हॉस्पीटलमध्ये विविध आजारांवरील शासकीय योजना तसेच कॅशलेस उपचार सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षित डॉक्टरांची टीम, आधुनिक सुविधा आणि रुग्णांविषयीची संवेदनशीलता यामुळे अल्पावधीतच या हॉस्पीटलने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.

रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांना नवजीवन मिळणे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहणे, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा असल्याचे मत हॉस्पीटलचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.

एकंदरीत, मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे हृदयरोग तपासणी शिबिर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्यदायी आणि दिलासादायक उपक्रम ठरत असून, वेळेत निदान आणि मोफत उपचारांमुळे अनेकांना नवजीवन मिळत आहे.


Protected Content

Play sound