मोठी बातमी : सावकारांनी हडपलेली जमीन शेतकर्‍यांना मिळणार परत !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवैध सावकारांनी यावल आणि रावेर तालुक्यात बळकावलेल्या १५ शेतकर्‍यांना त्यांची जमीन परत मिळणार असून जिल्हा उपनिबंधकांनी हा निकाल दिला आहे.

यावल आणि रावेर तालुक्यातील अवैध सावकारांच्या दहशतीचे अनेक किस्से प्रचलीत आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील काहीही कार्यवाही न झाल्यामुळे सावकार मुजोर झाले होते. तथापि, जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सावकारांना जबरदस्त दणका दिला आहे.

नंदकुमार मुकुंदा पाटील, मुरलीधर सुदाम राणे, मुरलीधर तोताराम भोळे, मधुकर तुकाराम राणे, मुरलीधर काशिनाथ राणे, सुदाम तुकाराम राणे, श्रीधर गोपाळ पाटील, मधुकर वामन चौधरी या सावकारांनी बेकायदा पध्दतीत मालमत्ता हडप केली होती. या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात तब्बल ४७ सुनावण्या झाल्या. यानंतर जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी १५ शेतकर्‍यांच्या हडप केलेल्या तब्बल ९६ एकर जमीन परत करण्याचे निर्देश दिलेत.

जळगाव जिल्हा उपनिबंधकांनी केलेली ही कारवाई राज्यातील सर्वात मोठी मानली जात आहे. दरम्यान, अवैध सावकार याच्या विरोधात न्यायालयात देखील जाऊ शकत नसल्याने हा निकाल खूप महत्वाचा असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

Protected Content