भाजीपाला खरेदी न झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई हवी : लोकसंघर्ष मोर्चा

जळगाव प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव न झाल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई मिळावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाने केली आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव शहरात जनता कर्फ्यू सुरू असला तरी कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाल्याची ठोक खरेदी-विक्री सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानुसार शुक्रवारी पहाटे परिसरातील शेतकर्‍यांनी आपल्या हमीप्रमाणे भाजीपाला जळगावला आणला; पण खरेदीसाठी व्यापारी आले नाही. त्यामुळे लाखो रुपये किमतीचा भाजीपाला उन्हामुळे खराब होऊ लागल्याने शेतकर्‍यांना अखेर तो फेकून द्यावा लागला. अनेक शेतकर्‍यांनी गोशाळेमध्ये गुरांसाठी चारा म्हणून भाजीपाला दिला. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

बाजार समितीमध्ये खरेदी-विक्री सुरू ठेवणे आणि किरकोळ भाजी मार्केट बंद ठेवणे हे परस्पर विरोधाभासी निर्णय आहे. त्यामुळे सर्व भाजीपाला उत्पादकांना नुकसानभरपाई देऊन शासनाने संवेदनशीलता दाखवावी, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, योगेश पाटील, भरत कर्डिले नरेंद्र महाजन, सोमनाथ पाटील, समाधान पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content