मध्यरात्री झाडाझडती : राजू सूर्यवंशींना अटक

भुसावळ प्रतिनिधी । पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री झाडाझडती घेतली असून यात वरणगाव येथील प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले रिपाइं नेते राजू सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी आणि त्यांचे बंधू अनंत सूर्यवंशी यांच्या विरूध्द वरणगाव पोलीस स्थानकात अलीकडेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून व्याजाची वसुली करण्यासाठी धमकावण्यासह दागिने हिसकावल्याचा आरोप फिर्यादी संजय त्रिलोकनाथ खन्ना (वय ५६, रा. साईनगर, दर्यापूर शिवार, वरणगाव फॅक्टरी) यांनी केला असून या आशयाची फिर्याद त्यांनी वरणगाव पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्थानकात गुरुनं ००३८/२०२१ भा.दं.वी.कलम ३९२,४५२, ५०४,५०६,३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता राजू सूर्यवंशी मिळून आले नव्हते.

या पार्श्‍वभूमिवर, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चीत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व त्यांच्या सहकार्‍यांनी कोंबींग ऑपरेशन राबविले. यात राजू सूर्यवंशी हे त्यांच्या निवासस्थानी आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्थानकात आणण्यात आले.

दरम्यान, राजू सूर्यवंशी यांना वरणगाव पोलिस स्थानकाचे निरिक्षक बोरेसे यांच्या ताब्यात देण्यात आले. तर, सूर्यवंशी यांना अटक केल्याची माहिती मिळताच मध्यरात्री पोलीस स्थानकासमोर त्यांच्या समर्थकांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमल्याचे दिसून आले होते. ही कारवाई पोलीस अधिक्षक अर्चीत चांडक व डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरीश भोळे, रमण सुरळकर, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव यांच्या पथकाने केली.

Protected Content