रेखा जरे हत्याकांड : पत्रकार बाळ बोठे अटकेत

अहमदनगर । येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील प्रमुख संशयित पत्रकार बाळ बोठे याला अखेर अटक करण्यात आली आहे.

३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने ५ आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला. यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. Rekha Jare Murder : Journalist Bal Bothe Arrested |

दरम्यान, गुन्ह्यात नाव आल्यानंतर मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले होते. तर बोठे याला अटक होत नसल्याने पोलिसांच्या तपासावर देखील संशय व्यक्त करण्यात आला होता. तर बोठेचे जामीन अर्ज देखील फेटाळण्यात आले होते.

या पार्श्‍वभूमिवर, आज शनिवारी पहाटे बाळ बोठे याला हैदराबाद येथून अटक करण्यात आली असून त्याला घेऊन पोलिसांचे पथक नगरकडे येण्यासाठी निघाले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक्षक मनोज पाटील पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देणार आहेत.

Protected Content