चाळीसगाव येथे उभारण्यात येणार दीड कोटींचा ऑक्सिजन प्लांट!

चाळीसगाव प्रतिनिधी । सध्या ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे चाळीसगावात १ कोटी ३७ लाखांचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याची आ. मंगेश चव्हाण यांनी दिली. आज माहिती जिल्हा शल्यचिकित्सक व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने तालुक्यात हाहाकार माजवला आहे. त्यात पुरेसा ऑक्सिजनचा साठा नसल्याने अनेक रूग्ण हे प्राण गमवतांना दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व प्रशासकीय अधिकारी यांना बोलावून आज बैठक घेतली. या बैठकीत डिपीडिसी या योजनेअंतर्गत १३५ जम्बो सिलेंडर क्षमतेचा १ कोटी ३७ लाखांचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असून यासाठी २ दिवसात प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आ. मंगेश चव्हाण यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने कोविड केअर सेंटरला ४ मेडिकल ऑफिसर, ४ स्टाफ नर्स, १० वार्डबॉय, २ डेटा एन्ट्री ऑपरेटर, १ एक्सरे टेक्निशियन अशी २१ नवीन पदे तात्काळ भरली जाणार आहेत. तसेच ५ व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन ऑक्सिजन बेड्सची संख्या ३८ वरून ७० इतकी वाढविण्यात येणार आहेत.

यासोबत आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन रक्त तपासणी मशीन, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, सेल काऊंटर, बायपॅप मशीन, एअर कंडिशनर, आयसीयू बेडस, दोन बेडस मध्ये कर्टन्स, स्वछतेसाठी टाईल्स क्लिनर आदी नवीन मशिनरी उपलब्ध होणार असल्याचे आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले येत्या ८ दिवसात जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शन चाळीसगाव तालुक्याला उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर गरज भासल्यास अजून ५० बेडसची क्षमता तातडीने वाढविण्यात येतील असेही आ. चव्हाण यांनी सुतोवाच केले.

Protected Content