जळगाव जिल्हा फेरफार निर्गतीमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर – जिल्हाधिकाऱ्‍यांची माहिती

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातर्गंत ई-फेरफार आज्ञावली हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून या फेरफार निर्गतीमध्ये जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. 

राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातर्गंत ई-फेरफार आज्ञावली हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सदरील प्रकल्प लोकहितार्थ व पारदर्शकतेतून जलदगतीने कामे होण्याच्या हेतूने राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि जनतेसाठी सदर प्रकल्प अतिशय जिव्हाळ्याचा आहे. विभागीय आयुक्त, नाशिक यांनी जळगांव जिल्ह्यातील दौ-यातील आढावा बैठकीमध्ये तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना ई-फेरफार प्रकल्पाअंतर्गत प्रलंबित फेरफार नोंदी निर्गती करण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिनांक 01/10/2020 रोजी जळगांव जिल्ह्यात 5,94,603 एवढ्या फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या होत्या व 18,974 एवढ्या फेरफार नोंदी निर्गतीकरणासाठी प्रलंबित होत्या. प्रमाणीकरणाची एकूण टक्केवारी 89.94 टक्के एवढी होती. 

माहे 1 आक्टोबर ते 13 आक्टोबर 2020 या 12 दिवसात 5,472 नवीन फेरफार दाखल करून घेण्यात आले तर 13,004 एवढ्या फेरफार नोंदीं निर्गत करण्यात आल्या. तरी अद्यापही 11,442 फेरफार निर्गत होण्यावर प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रमाणिकरणासाठी कालावधी पूर्ण न झालेल्या तसेच विवादग्रस्त/तक्रार फेरफार यांचा समावेश आहेत. विवादग्रस्त/तक्रार फेरफार सुनावणीवर आहेत. 

जळगांव जिल्ह्यात आजतागायत 5,51,055 इतक्या फेरफार दाखल करुन घेण्यात आलेल्या आहेत. तर 6,07,607 इतक्या फेरफार नोंदी निर्गत करण्यात आलेल्या आहेत. प्रमाणीकरणाची टक्केवारी 98.46 टक्के एवढी आहे. जळगांव जिल्हा फेरफार निर्गतीमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याने याचे सर्व श्रेय जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, नायब  तहसिलदार (डि.बी.ए.) तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच यश संपादन करता आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

जळगांव जिल्ह्यातील तालुकानिहाय फेरफार प्रमाणीकरणाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. :- जळगांव 97.57 %, चोपडा 99.04 %, चाळीसगांव 98.60%,  जामनेर 98.07 %,  रावेर 98.65 % भुसावळ 99.23 %, पारोळा 98.50 %, भडगांव 98.02 %, अमळनेर 99.21 %, पाचोरा 98.11 % यावल 99.20 % एरंडोल 98.79 %, मुक्ताईनगर 98.90 %, बोदवड 98.57 % व धरणगांव 99.05 जळगांव जिल्ह्याची एकूण फेरफार निर्गतीची टक्केवारी 98.46 % फेरफार निर्गतीमध्ये जळगाव जिल्ह्यानंतर वाशिम दुस-या, अकोला तिस-या, बुलढाणा चौथ्या व नाशिक पाचव्या क्रमांकावर असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कळविले आहे.

Protected Content