जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे मराठा आरक्षणाला समर्थन

जळगाव प्रतिनिधी । रक्षाताई खडसे व उन्मेषदादा पाटील या जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिले असून याबाबतचे निवेदन खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांना देण्यात आले.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्यात आंदोलन पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीने कोर्टात बाजू व्यवस्थीत न मांडल्याने ही स्थिती उदभवल्याचा सामाजिक संघटनांनी आरोप केला आहे. तर भाजपनेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील खासदारांनी मराठा आरक्षणाला जाहीर समर्थन दिले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात उत्तर महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी आज खासदार छत्रपती संभाजीराजे यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणा संदर्भात केंद्र सरकार राज्य सरकार व न्यायालयीन प्रक्रिया बाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व खासदारांनी एकत्रित रित्या या लढ्याचे नेतृत्व खासदार छत्रपती संभाजीराजे करावे. अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांना सोबत घेऊन लढ्यास योग्य दिशा द्यावी . यासाठी आम्ही सर्व खासदार आपल्या सोबत असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी लोकसभेचे खासदार उन्मेश दादा पाटील , खासदार रक्षाताई खडसे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार डॉ. प्रीतमताई मुंढे,खासदार डॉ. हिना गावित,खासदार डॉ. भारतीताई पवार यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या लढ्याचे कौतुक खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. यावेळी राज्य सरकारकडून पुढच्या काळात मराठा आरक्षण लढ्यासंदर्भात योग्य वेळी योग्य भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Protected Content