जळगाव जिल्ह्यात ‘हेल्यांच्या टकरा आणि शेताचा धिंगाणा !’ : अशोकराव शिंदे यांची पोस्ट व्हायरल

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन या दोन मोठ्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असून एकमेकांवर खालच्या स्तरावर जाऊन टिका केली जात आहे. विकासाचे व जनहिताचे मुद्दे सोडून हे नेते आता एकमेकांच्या वैयक्तीक आयुष्यावर घसरले आहेत. या सर्व प्रकारावर छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा रेड स्वस्तिक सोसायटीचे राज्य सचिव अशोकराव शिंदे Ashokrao Shinde यांनी सोशल मीडियात अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. वाचा ते नेमके काय म्हणतात ते ?

जळगाव जिल्ह्यात एकमेकांचे परमस्नेही एकाच विचाराने प्रेरित अत्यंत जिवलग असलेल्या दोन राजकीय महात्मया मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला एकमेकां विरुद्धची फड संस्कृती जळगाव साठी शोभनीय नाही. आज जळगाव जिल्ह्यात कोरोणाच्या राक्षसाने घातलेले थैमान थांबायचे नाव घेत नाही. प्रत्येक नागरिक आपले श्वास किती दिवस शिल्लक आहे या विवंचनेने गुदमरून गेला आहे.

उघड्या डोळ्यांसमोर धडधाकट तरुणांपासून तर निरोगी माणसेही अचानक मृत्युच्या दाढेत गेल्याच्या वार्तेने श्रद्धांजली या शब्दांचा तिटकारा वाटतो आहे. कोणत्यातरी इंजेक्शनच्या भोवती आपला जिवलग वाचावा म्हणून पायपीट करून भाऊ बहिन आई वडील वनवन भटकत आहेत. इंजेक्शनच्या काळा बाजाराच्या गर्तेत मरणच सोपे वाटायला लागले आहे. त्यातच ज्या अन्न व औषध प्रशासनाचे यावर नियंत्रण असावे तो जिल्ह्याचा निरीक्षक दर्जाचा अधिकारी हप्तेखोरी च्या नादात स्वतःचा बचाव व्हावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाहीर पत्रक काढून कांगावे करीत आहे अशा अवस्थेत सामान्यांनी काय करावे कुणाकडे जावे ?

हा साने गुरुजींचाच जिल्हा आहे ना? बहिणाबाईंचा जिल्हा आहे ना? शिवरायांची शौर्य गाथा लिहिनाऱ्या दु. आ. तीवारींचा हा जिल्हा आहे ना? भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पहिले ग्रामीण काँग्रेस अधिवेशन यशस्वी करणाऱा महात्मा गांधींसह अनेक स्वतंत्रसेनानी योद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा आहे ना असा प्रश्न पडल्या वाचून राहात नाही?. चाललंय तरी काय या जळगाव जिल्ह्यात?

या जिल्ह्यात राजकीय द्वेषापोटी एकमेकांना संपवण्याच्या नादात जिल्ह्याची पार मातीच झाली,उभे उद्योग आडवे झाले,.औद्योगिक विकास थांबला, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था कौटुंबिक झाल्या, सूतगिरण्या असो साखर कारखाने असो या सर्वांच्या मशिनी भंगार बाजारात गेल्या.

एवढे कर्तुत्ववान नेते जळगाव जिल्ह्यात आज कार्यरत आहेत? पाणी आहे रेल्वे आहे हायवे आहे विमानतळ आहे विज निर्मिती प्रकल्प आहे हे सारं काही असताना इथल्या जनतेच जगणं ओसाड राना सारखंच झाल आहे! माझा एक मित्र सहज बोलता बोलता म्हणाला अरे अशोकराव तुमच्या जळगाव जिल्ह्यात हेल्यांच्या टकरा अन शेताचा धिंगाणा ! असंच काहीस चाललेले दिसतय. मी म्हणालो खरंच आपण खरेच बोललात हेच आमच्या जिल्ह्यात चाललेल आहे आणि त्यामुळे जळगांव जिल्ह्यातला सामान्य माणूस हतबल आहे. आहे ते सहनच करायचे याची जिल्ह्यातील आम्हा जिल्हा वासियांना सवयच झाली आहे.

त्याने मला सोशल मीडियावरील एक ऑडिओ क्लिप ऐकवली म्हणाला हे जेष्ठ व माजी मंत्री असलेले एका मोठ्या नेत्याला एका ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांने आपल्या गावातील पाणी समस्या बाबत फोनवर विनंती केली आणि या नेत्यांनी त्या शाळकरी मुलांशी बोलताना जे शब्द वापरले ना ते निश्चित त्यांच्या सुयोग्य आहेत का? असो. त्या परिसरातील माजी मंत्री असलेल्या आमदार आणि या नेत्याच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये शालेय मुलासोबत असला संवाद सुसंस्कृत म्हणावा लागेल का?

तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांनी कोणाविषयी काय बोलावे तो त्यांचा अधिकार आहे. पण गावातील पाण्यावरून चाललेला या विषयाबाबत मला म्हणायचे की 1995 ते 1999 यादरम्यान हे राजकीय महात्मा राज्याचे जलसंपदा मंत्री होते. ते ज्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात त्या़ंच्या मतदार संघातील बोदवड या तालुक्यातील जनता अजूनही प्रचंड दुष्काळाचे चटके सहन करते आहे. येथील जनता जगता-जगता मरते आहे. इथल्या जनतेचे दुःख मी स्वतः अनुभवलेले आहे. आजही बोदवडकरांना व त्या तालुक्यातील जनतेच्या पाण्याच्या प्रश्नांबाबत काही अपवाद वगळता कोणी साधा ‘ब्र’ सुद्धा काढत नाही.

उलट तेथील पाणी ऊपसा योजना कशा बंद करायच्या वा कशा बंद पाडायचा याचेही षड्यंत्र जळगाव जिल्ह्याने अनुभवलेले आहे. मला आठवते जळगाव जिल्ह्याच्या कन्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीं महामहिम प्रतीभाताई पाटील यांचा राष्ट्रपती झाल्यानंतरचा पहिलाच दौरा जळगाव जिल्ह्यात असताना मी त्यांना एक जाहीर असे विनंती सह कळकळीचे पत्र लिहिले होते. त्यामध्ये ”ताईसाहेब गिरणामाई वाचवा !” अशी आर्त हाक माझ्या पत्रातून मी ताईसाहेबांना दिली होती. या माझ्या कळकळीच्या आवाहानाच्या जाहीर पत्राला दै. सकाळ दै.पुण्यनगरी, साईमत यासह अनेक वृत्तपत्रांनी भरभरून प्रसिद्धी दिली.

कधीकाळी प्रचंड समृद्ध असलेला गिरणा काठ पार उद्ध्वस्त झाला आहे. आमच्या गिरणा माईच्या काठावर पिकलेली केळी दिल्लीच्या बाजारातील प्रतिष्ठित होती. पाहता पाहता आमचा समृद्ध गिरणा काठ उद्ध्वस्त झाला आहे. आमच्या गिरणा माईचा एक थेंबही पाणी आडवण्यासाठी आमच्या तिथल्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणावा यावर आजपर्यंत ठोस प्रकल्प आला नाही. ठरवून येऊ दिला नाही.परिणामी हा परिसर ऊजाड झाला.

आमच्या गिरणा माईचं पाणी असो किंवा आमच्या तापी माईचे पाणी या पाण्याचा बळावर गुजरात सारखा राज्य समृद्ध झाल आणि या गिरणी माईच्या परिसरातील भुमीपुत्रांनी रोजगाराच्या शोधात घरदार सोडली.आमच्या गिरनामाईच्या वाळूवर नाशिक ठाणे मुंबईच्या शेकडो मजली इमारती उभ्या राहिल्या. ईथला माणूस देशोधडीला लागला.गावच्या गाव उजाड झाली. गिरणा माईचं पाणी अडवलं पाहिजे ते इथे जिरवला पाहिजे. इथल्या भूमिपुत्रांना शक्ती दिली पाहिजे असा विचार करणारा माईचा लाल अजूनही या जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात कार्यरत नाही. त्यामागचं कारण आहे.

जर गिरणा माईच पाणी अडवलं तर चाळीसगाव असो भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, जळगाव असो येथे समृद्धता येईल आणि इथला माणूस आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या शक्तिशाली होईल आणि आपले राजकीय प्राबल्य कमी होईल या भीतीपोटी या गिरणामाईच पाणी अडवण्यासाठी कुठलाच प्रकल्प होऊच नये असेच प्रयत्न जलसंपदा विभागाकडून झाले. हा माझा दावा आहे.गिरणामाईला ओरबडणाऱ्या रेती माफियांची ‘गॉड फादर’ कोण याचा ही शोध घेतला तर आपलाच भ्रमनिरास होईल. महाराष्ट्रामध्ये 1995 पासून तर 2019 पर्यंत दोन वेळा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जलसंपदा विभागाची जबाबदारी प्रमुख मंत्री पदाची जबाबदारी जळगाव जिल्हा कडे असून सुद्धा आज आमच्या बोदवड जामनेर पाचोरा भडगाव चाळीसगाव अमळनेर पारोळा हे तालुके कायम दुष्काळाच्या छायेत आहेत.

जळगाव पासुन काही अंतरावर असलेल्या शेळगाव बॅरेजचे काम गेल्या वीस ते बावीस वर्षापासून जैसे थे आहे. हा प्रकल्प जर वीस वर्षांपूर्वी पूर्ण झाला असता तर यावल भुसावळ, जळगाव, जामनेर, बोदवड या.परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला असता. हा परिसर अत्यंत समृद्ध झाला असता. होय याच प्रकल्पावर बरोबरचा शहादा-प्रकाशा बॅरेज प्रकल्प पंधरा वर्षापूर्वी पूर्ण होऊन आज हा परिसर अत्यंत समृद्धीकडे वाटचाल करतो आहे.आणि खिळखिळा शेळगाव बॅरेज प्रकल्प पूर्ण होऊ नये असे तर षड्यंयंत्र कुणाचे? याचे उत्तर राज्याच्या जलसंपदा विभागाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला दिले पाहिजे.

आपापसात भांडण करून एकमेकांचे कपडे फाडणाऱ्या या राजकीय महात्म्यांना जळगाव जिल्ह्यातील जनतेने गेल्या तीस वर्षात अक्षरशाः डोक्यावर घेऊन मिरवले. कधीकाळी एकमेकांच्या गळ्यात गळा घालणारे हे दोन्ही नेते सिडी काढू…ई डी काढू बीडी काढू अशा चर्चा करतात.त्याने मनोरंजक आणि व्देषापलीकडे काय होणार. त्यापेक्षा या राजकीय महात्म्यांनी काही काळासाठी का होईना आपले मतभेद मनभेद बाजूला ठेवुन पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवायला हवे. जिल्ह्यातील बेरोजगार तरूणांचे बाहेर जाणारे लोंढे थांबविण्यासाठी रोजगार निर्माणासाठी ऊदयोग सुरु केले पाहिजे बंद पडलेले साखर कारखाने सुत गिरण्या सुरू केल्या पाहिजे. तेवढे या दोन्ही राजकीय महात्म्यांचे मुंबई ~दिल्लीत मोठे वजन आहे त्याचा उपयोग केवळ जळगाव च नाही तर कान्हदेशासाठी होईल. वैभवशाली दिवस येतील. गिरणा काठ पुन्हा बहरून येईल. आज घडीला जिल्ह्यातील लोकांच्या समोर जे दुःखाचे सावट आहे प्रचंड भीती दहशत आहे यावर मात कशी करता येईल यासाठी या राजकीय महात्म्यानी बळ द्यावे सामान्यांना शक्ती द्यावी त्यांना शक्य ती मदत करावी. नाहीतर माझा मित्र म्हणाला की जळगाव जिल्ह्यात हेल्यांच्या टकरा अन शेताचा धिंगाणा हेच चालू आहे . हे त्याचे जिव्हारी लागणारे शब्द गुमान ऐकावेच लागतील.

अशोक एस. शिंदे Ashokrao Shinde
9422283233

Protected Content