मि. इंडिया बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचाही कोरोनाने बळी घेतला आहे. बॉडी बिल्डिंगमधील मानाचा मि. इंडिया हा किताब पटकावणारा  जगदीश लाड केवळ 34 वर्षांचा होता. जगदीशच्या जाण्याने लाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

जगदीशला काही दिवसापूर्वी कोरोना झाला होता. त्याच्यावर गुजरातमधील बडोदा इथं उपचार सुरु होते. तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदशीसारख्या धष्टपुष्ट तरुणाला कोरोना हतबल करत असेल, तर जे कोणी कोरोनाला सिरियस घेत नसेल, त्यांनी आता पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

 

जगदीश लाड हा नवी मुंबईत राहात होता. त्याने मागील वर्षीच गुजरातमधील बडोदा इथं जीम सुरु केली होती. त्यामुळे तो तिकडेच असायचा. जगदीशला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगचं आकर्षण होतं. त्यामुळे पिळदार शरीरयष्टीच्या जगदीशने महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा गाजवल्या. त्याने नवी मुंबई महापौर श्रीसह मोठ मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं पटकावली होती.

 

जगदीशच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे त्याने मिस्टर इंडिया या मानाच्या स्पर्धेत दोनवेळा सुवर्णपदकं पटकावली होती. मुंबईतील वर्ल्ड चॅम्पियन्सशिपमध्ये त्याला कांस्य पदक मिळालं होतं.

 

जगदीश लाडच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Protected Content