बनावट दारू भोवली; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चौघे निलंबीत

जळगाव प्रतिनिधी | भुसावळ येथे बनावट दारूचा कारखाना सुरू असतांनाही स्थानिक अधिकार्‍यांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणून तेथील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या चौघा कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी भुसावळ शहरातील शिवपूर-कन्हाळा रोडवर एका फर्निचरच्या दुकानाच्या गोदामावर छापा टाकून तेथे सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना उध्वस्त करण्यात आला होता. भुसावळात हा कारखाना सुरू असतांना पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेली ही कारवाई चर्चेत आली होती. यामुळे भुसावळातील अधिकारी काय करत होते ? हा प्रश्‍न विचारण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकाराची राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे गंभीर दखल घेण्यात आली. या अनुषंगाने खात्याचे भुसावळ येथील निरिक्षक आय.एन. वाघ यांच्यासह के.बी. मुळे; एस.एस. निकम व एम.बी. पवार या चार कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याचे सचिव कांतीलाल उमप यांनी हे आदेश जारी केले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क खात्यातील गैरव्यवहार हे आधीदेखील वादाच्या भोवर्‍यात सापडले असले तरी एकाच वेळी निरिक्षकासह चौघांना निलंबीत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Protected Content