गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड

सोलापूर | एकाच मतदारसंघातून तब्बल अकरा वेळेस निवडून येण्याचा विक्रम करणारे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे रात्री निधन झाले असून त्यांच्या निधनानंतर मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे १० ऑगस्ट १९२६ रोजी शेतकरी कुटुंबात जन्म झालेले देशमुख हे वकिली व्यवसायामुळे सांगोला येथे स्थायिक झाले. त्यावेळी सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी झोकून दिले. १९६२ साली देशभरात काँग्रेसचे वर्चस्व असतानाही सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापकडून देशमुख उभे राहिले आणि वयाच्या ३४ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. १९७२ साली त्यांना पराभव पत्करावा लागला. तत्कालीन आमदार काकासाहेब साळुंखे यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. त्यात गणपतराव देशमुख निवडून आले. नंतर १९९५ सालचा अपवाद वगळता ते २०१९ पर्यंत म्हणजे तब्बल ५२ वर्षे आमदार राहिले. आमदारकीचा बहुतांशी काळ ते विधिमंडळात विरोधी बाकावर बसले. १९७८ साली शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये आणि नंतर १९९९ साली शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा देशमुख यांनी मंत्रिपद सांभाळले.

राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.

Protected Content