आपली मुले किती पराक्रमी हे बघा ! : नारायण राणेंचा ठाकरेंना टोला

सावंतवाडी | माझी दोन्ही मुले कर्तबगार असून माझ्या नियंत्रणात आहेत, तुमची मुले किती पराक्रमी आहे हे बघा असा खोचक टोला आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मारला. तर टिकेचे प्रकार थांबले नाहीत, तर आपणही दैनिक प्रहारमधून याला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा देखील राणेंनी दिला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेची सावंतवाडी येथे सांगता होत आहे. याआधी आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जनआशिर्वाद यात्रेला कोकणात प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. आजही उशीर झाला तरी हजारो लोक थांबलेले आहेत. मात्र यात्रेच्या दरम्यान, अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राणे यांच्या विरूध्द बोलले की शिवसेनेत पदे मिळतात हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

नारायण राणे पुढे म्हणाले की, शिवसेनेचे नेते माझ्या मुलांबाबत चिंता व्यक्त करतात. मात्र त्यांनी याची चिंता करण्याची गरज नाही. माझी दोन्ही मुले कर्तबगार असून माझ्या नियंत्रणात आहेत. तुमची मुले किती पराक्रमी आहेत याचे बघा असा टोला त्यांनी मारला. याप्रसंगी नारायण राणे यांनी विनायक राऊत, संजय राऊत, अनिल परब आदींवर कडाडून टीका केली. तर शिवसेनेच्या नेत्यांनी टीका थांबविली नाही, तर आपणही दैनिक प्रहारमधून याला प्रत्युत्तर देऊ असा इशारा देखील नारायण राणे यांनी याप्रसंगी दिला.

याप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल विचारले असता नारायण राणे म्हणाले की, कोण कुणाला भेटले याचा आपल्याला फरक पडत नाही. आपण यानंतर शिवसेनेच्या मागे जोरात लागले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले.

Protected Content