Home Cities यावल पहूरच्या मेळाव्यात मोठ्या घोषणा! आदिवासी मुलींच्या शिक्षणासह तरुणांच्या रोजगाराला मिळणार बळ

पहूरच्या मेळाव्यात मोठ्या घोषणा! आदिवासी मुलींच्या शिक्षणासह तरुणांच्या रोजगाराला मिळणार बळ

0
1

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथील माळी समाज मंगल कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ तडवी-भिल्ल समाजातील नागरिकांसाठी भव्य आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यात तडवी-भिल्ल समाजातील बांधवांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन करण्यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, उत्कृष्ट आश्रमशाळांचा गौरव आणि महिला बचत गटांना आर्थिक सहाय्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आदिवासी समाजातील मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जामनेर येथे मुलींचे सुसज्ज वसतिगृह आणि कुंभारी येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण मेळाव्याला राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार प्रा. अशोक उईके होते. व्यासपीठावर पसमंदा मुस्लिम समाज अभ्यास समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) इद्रिस मुलतानी, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अपर आयुक्त दिनकर पावरा, उपायुक्त हिवाळे, नीलेश अहिरे तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (यावल) चे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी शासकीय योजनांची माहिती थेट तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. अशोक उईके यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. जामनेर येथे मुलींच्या वसतिगृहामुळे आदिवासी विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाची सोय होणार असून, कुंभारी येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राद्वारे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण व आदिवासी तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, मंत्री गिरीश महाजन यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. या मेळाव्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तर ‘सुंदर माझी शाळा’ अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते महिला बचत गटांनी लावलेले व्यवसाय व विविध उत्पादनांचे स्टॉल्स. या प्रदर्शनात बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांची मोठी विक्री झाली. राज्यात सध्या सुमारे ६८ हजार महिला बचत गट कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यावर भर दिला जात असल्याचे ना. अशोक उईके यांनी नमूद केले. या प्रसंगी पात्र महिला बचत गटांना आर्थिक सहाय्याचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन व नियोजन प्रकल्प कार्यालयाने केले, तर शेवटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Protected Content

Play sound