फैजपूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीसह जगन्नाथ रथयात्रा महोत्सव

govinda 1

फैजपूर प्रतिनिधी । येथील श्री गौर राधा कृष्ण मंदिरात सालाबादप्रमाणे दि. 28 ऑगस्ट बुधवार रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव आणि दि. 29 ऑगस्ट रोजी श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव (दि.29) रोजी सकाळी 11 वाजता महाआरती व वैदिक विधि नियमानुसार रथयात्रेची सुरुवात सुभाष चौकातून करण्यात येणार असून खुशालभाऊ रोड, रथगल्ली, लक्कड पेठ, मारूती मंदिर, सुभाष चौक, छत्री चौक, त्रिवेणी मंदिर या मार्गे खंडोबा वाडी देवस्थानांमध्ये रथयात्रेचे समापन होईल. त्यानंतर खंडोबावाडी देवस्थानात संध्याकाळी 4 वाजेपासून हरीनाम संकीर्तन, जगन्नाथ कथा, पुष्प अभिषेक, छप्पन भोग, महाआरती व सर्वांसाठी भंडारा (महाप्रसादाचे) आयोजन करण्यात आले आहे.

श्री जगन्नाथ रथ यात्रेनिमित्त दि. 27 ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत परमपूज्य भक्ती सुमन गोविंद स्वामीमहाराज (श्रीधाम वृंदावन) यांची कथा श्रीश्री राधा कृष्ण मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. या रथयात्रेमध्ये देश-विदेशातून अनेक साधु संतांचे आगमन होणार असून मोठ्या संख्येने परिसरातील भाविक-भक्तांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी खंडोबा वाडी देवस्थान येथील महामंडलेश्वर 1008 श्री.श्री पुरुषोत्तम दास महाराज यांनी मंदिरातील सभामंडप उपलब्ध करून दिला आहे. तसेच फैजपूर व परिसरातील नागरिकांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम व श्री जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव या कार्यक्रमात उपस्थित राहून भगवत कृपा प्राप्त करावी असे आवाहन श्री.श्री गौर राधा कृष्ण मंदिराचे अध्यक्ष श्रीमान सचिनंदन प्रभू यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Protected Content