जळगावकरांसाठी लवकरच सामूहिक विमा योजना- आ. राजूमामा भोळे ( व्हिडीओ )

rajumama bhole

जळगाव प्रतिनिधी । हुडकोचे कर्ज प्रकरण मार्गी लागल्यानंतर लवकरच जळगावातील नागरिकांसाठी सामूहिक विमा योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली. ते आज लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

कालच राज्य मंत्रीमंडळाने जळगाव महापालिकेसाठी अत्यंत संवेदनशील विषय असणार्‍या हुडकोच्या कर्जाचे प्रकरण मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पावले उचलली. यामुळे आता दरमहा भरण्यात येणार्‍या व्याजाच्या रकमेतूनच कर्जाचे मुद्दल फेडले जाणार आहे. यामुळे शहराच्या विकासात निर्माण झालेला अडसर दूर झाल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमिवर आज आमदार राजूमामा भोळे यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकरणातील विविध कंगोरे नमूद करून आगामी कामांबाबत विवेचन केले. ते म्हणाले की, आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असून आम्ही जनतेच्या सेवेचा विडा उचलला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना. गिरीश महाजन आणि माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाने जळगावसाठी कळीचा मुद्दा असणारा हुडकोच्या कर्जाचा विषय मार्गी लावण्यात आला आहे. आता लवकरच जळगावातील गाळेधारकांचा प्रश्‍नदेखील मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले. तसेच जळगावकरांसाठी सामूहिक विमा योजना सुरू करण्यात येणार असून याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत होऊ शकेल असे ते म्हणाले.

आमदार राजूमामा भोळे पुढे म्हणाले की, जळगावकरांसाठी गत पाच वर्षांमध्ये आठशे कोटी रूपयांची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. यातील बरीचशी कामे आता सुरू झालेली आहेत. तर उर्वरित पायाभूत सुविधांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. ते म्हणाले की, अनेक जण माझ्यावर नगरसेवकाच्या भूमिकेतून अद्यापही बाहेर न आल्याची टीका करतात. मात्र मी खर्‍या अर्थाने अजूनही सेवकच असून हा आपल्यासाठी गौरव असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दरम्यान, मेडिकल हबच्या माध्यमातून शहरावासियांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध झालेली असून यासाठी ना. गिरीश महाजन यांचे प्रयत्न महत्वाचे ठरलेले आहेत. तर लवकरच सुरू होणार्‍या विमानसेवेसाठी खासदार उन्मेष पाटील यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरल्याचे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.

पहा : आमदार राजूमामा भोळे यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ.

Protected Content