जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात पानटपरीवर मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी गेलेल्या मुलाला चोर म्हटल्याचा जाब विचारल्याने विशाल भाऊसाहेब मोरे (३०, रा. गेंदालाल मिल) यांच्या डोक्यात थेट भजे तळण्याचा झारा मारला. ही घटना रविवारी ११ मे रोजी सायंकाळी
घडली.
याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी विशाल मोरे यांचा मुलगा ११ मे रोजी रात्री रेल्वेस्थानक परिसरातील एक पानटपरीवर मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी गेला असता तेथे त्याला तुम्ही चोर आहे, असे दोन जणांनी म्हटले. त्याविषयी मोरे यांनी जाब विचारला. त्याचा राग आल्याने दोन जणांनी त्यांना शिवीगाळ करीत भजे तळण्याचा झारा डोक्यात मारला. यामुळे मोरे यांना दुखापत झाली.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रवींद्र पाटील करीत आहेत.