रेल्वे सुरक्षा दलाची तत्परता: हरवलेली बॅग दिल्याने प्रवाशाने मानले आभार

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पश्चिम रेल्वे अंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बल अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाची सुमारे ४० हजार किंमतीची बॅग सुरक्षितपणे परत मिळविण्यात यश आले आहे. यामध्ये रोख रक्कम २० हजार सॅमसंग टॅब (१५ हजार) व अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश होता.

८ मे रोजी गाडी क्रमांक २२९७३ रात्री ३:०८ वाजता अमळनेर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. ०२ वर पोहचली. त्यावेळी RPF चे उपनिरीक्षक श्री. खेल सिंग मीना रात्रीच्या गस्तीदरम्यान कर्तव्यावर होते. त्यांच्या लक्षात आले की दोन प्रवासी, संतोष कुमार व सौरव कुमार (भागलपूर, बिहार) गाडीच्या S/2 कोचमधून उतरत होते.

चौकशीत प्रवाशांनी सांगितले की ते चुकीने या गाडीने प्रवास करत वडोदऱ्यावरून अमळनेर येथे पोहचले. त्यांना वाटले की त्यांची बॅग गाडीत राहिली आहे, म्हणून त्यांनी S/2 कोचमधील एका प्रवाशाला बॅग खाली फेकण्यास सांगितले. परंतु चुकीने दुसऱ्याच प्रवाशाची बॅग खाली आली.

यानंतर, बॅग व प्रवाशांना RPF पोस्ट, अमळनेर येथे आणण्यात आले. RPF कॉन्स्टेबल अजय कुमार पाल यांना तत्काळ जळगाव स्थानकावर गाडी पोहचल्यावर प्रवाशांशी संपर्क करून बॅगची माहिती मिळवण्याचे आदेश देण्यात आले. तपासादरम्यान, श्री सूर्य नारायण (आंध्रप्रदेश) यांनी बॅग ओळखली. ते गांधीधामहून ब्रह्मपूरकडे प्रवास करत होते आणि त्यांनी सांगितले की अमळनेर येथे बॅग घेण्यासाठी येणार आहेत.

११ मे रोजी प्रवासी अमळनेर स्थानकावर गाडी क्र. २२९७४ ने पोहचले. त्यांनी बॅगची अचूक ओळख पटवून बॅगमध्ये असलेल्या रोख रक्कम व इतर वस्तूंची माहिती दिली. RPF टीमने सत्यापन करून बॅग त्यांना सुरक्षितपणे सुपूर्त केली.

या कार्यप्रणालीचे खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगाव व संबंधित प्रवाशाने विशेष कौतुक करत अमळनेरच्या RPF अधिकाऱ्यांचे आभार मानले. RPF ची तत्परता, प्रामाणिकपणा व दक्षतेचे समाजातून मोठे स्वागत होत आहे.

Protected Content