यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात खरीप हंगाम २०२५-२६ च्या पेरणीपूर्व नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शेतकरी बांधवांनी कृषी अधिकाऱ्यांवरील असंतोष व्यक्त केला. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकूनही समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे बैठकीचे वातावरण चांगलेच तापले. चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांनी कृषी अधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली.
ही महत्वपूर्ण बैठक १२ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता यावल तहसील कार्यालयाच्या इमारतीत पार पडली. बैठकीला फैजपूर विभागाचे प्रांतधिकारी बबनराव काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे) हे प्रमुख उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नियोजन, बोगस बियाण्यांचा प्रश्न, वेळेवर मिळणारे खत व बियाणे या मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली. मात्र, तालुका कृषी अधिकारी भरत वारे व त्यांच्या टीमकडून स्पष्ट व समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज झाले. बैठकीदरम्यान अनेकांनी आपल्या भावना थेट आमदारांसमोर मांडल्या.
या बैठकीत आमदार अमोल जावळे आणि प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारत कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, आणि त्याचे प्रश्न वाऱ्यावर सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही,” असा कडक इशाराही आमदारांनी दिला.
बैठकीस यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, हिरालाल चौधरी, रविंद्र उर्फ छोटू पाटील, नारायण चौधरी, सागर कोळी, उमेश बंडाळे, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, तुषार (मुन्ना) पाटील, भरत चौधरी, सूर्यभान पाटील आदींसह तालुक्यातील अनेक शेतकरी आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीतून स्पष्ट झाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात सोडवण्याची गरज आहे. अधिकार्यांनी यापुढे जबाबदारीने काम करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम आमदारांनी दिला आहे.