स्कॉर्पिओच्या धडकेत महिला जखमी, चालक फरार


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील हॉटेल टुरिस्ट समोर रस्त्यावर घडलेल्या एका अपघातात एक महिला जखमी झाली असून, अपघातास कारणीभूत ठरलेला स्कॉर्पिओ चालक अपघातानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी शिवाजी युवराज पाटील (वय 47, रा. हिराशिवा कॉलनी, जळगाव) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ही घटना रविवारी 11 मे रोजी रात्री 8.30 वाजता घडली. फिर्यादी शिवाजी पाटील हे डिजीटेक मेडिकल इक्युपमेंट या कंपनीत सर्व्हिस इंजिनिअर म्हणून काम करतात. नेहरू चौकातून घरी जात असताना, हॉटेल टुरिस्ट समोर एक वाहन रस्त्यात थांबलेले होते. त्या वाहनामागे प्रवासी रिक्षा थांबलेली असल्याने पाटील यांनी त्यांची व्हेंटो कार (क्र. MH-05-DE-0068) थांबवली. त्याचवेळी मागून भरधाव वेगात आलेल्या स्कॉर्पिओ (क्र. MH-19-DV-6886) ने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की पाटील यांची कार समोरील रिक्षावर आदळली.

या अपघातात रिक्षामधील प्रवासी महिला खैरुननाज इरफान भिस्ती (वय 24) हिला डोक्याला मार लागला. पाटील व महिलेचे पती इरफान यांनी तिला तात्काळ डॉ. डाबी न्युरो सेंटरमध्ये दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.